कॉलेजचा वाद घरात, घरातला वाद पोलिसांत
By admin | Published: December 29, 2014 10:49 PM2014-12-29T22:49:00+5:302014-12-29T23:50:05+5:30
बाजारपेठ गल्लीतील महिलेने महादेव गल्लीतील महिलेच्या विरोधात आजरा पोलिसांत तक्रार अर्ज दाखल केला.
उत्तूर : गडहिंग्लज येथे शिक्षण घेणाऱ्या उत्तूर (ता. आजरा) येथील मैत्रिणींची किरकोळ कारणावरून धुसफूस सुरू होती. या दोघी मैत्रिणींनी याबाबत कल्पना घरात दिली. जाब विचारण्याच्या कारणावरून दोन प्रतिष्ठित घराण्यांच्या महिलांचा वाद सुरू झाला. बाजारपेठ गल्लीतील महिलेने महादेव गल्लीतील महिलेच्या विरोधात आजरा पोलिसांत तक्रार अर्ज दाखल केला.
गेले पंधरा दिवस हा विषय उत्तुरात घुमत आहे. दोन्ही घराणे प्रतिष्ठेची. नेहमी एकमेकांत ये-जा करीत असणारी आहेत. महादेव गल्लीतील महिला विचारणा करावयास बाजारपेठेतील महिलेकडे गेली असता त्यांच्यात शाब्दिक चकमक घडली. गोंधळाचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले. तक्रारदार महिलेने उपस्थित लोकांची नावेही साक्षीदार म्हणून घातली आहेत.
महादेव गल्लीतील ‘ती’ महिला असभ्यतेचे वर्तन करते, शिवीगाळ करते, असा आरोपही तक्रारदार महिलेने केला आहे. तिच्यावर कारवाई करावी म्हणून तिचा पती पोलिसांकडे येत आहे. याबाबत तडजोड करून प्रकरण मिटविण्याचाही प्रयत्न प्रतिष्ठित राजकीय व्यक्तींनी केला.प्रकरण निकाली काढण्याच्या दृष्टीने पोलिसांनी प्रयत्न केले असता, महादेव गल्लीतील महिला घरगुती कार्यक्रमासाठी बाहेर गावी गेली. ती आली; पण तक्रार करणारी महिला तिच्या कामासाठी बाहेर गावी गेली. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी बनली आहे. पोरींचा कॉलेजमधील ताप पालकांच्या माथी आला आहे. या दोन महिलांचा वाद कारण नसताना चर्चेचा बनला आहे. (वार्ताहर)