मैत्रिणींच्या त्रासाला कंटाळून कॉलेज युवतीची आत्महत्या ?
By admin | Published: January 5, 2016 01:13 AM2016-01-05T01:13:27+5:302016-01-05T01:13:27+5:30
युवती महूदची : नागाळा पार्क परिसरातील घटना
कोल्हापूर : मैत्रिणींच्या सततच्या त्रासाला कंटाळून विवेकानंद कॉलेजमध्ये बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या युवतीने वारणा कॉलनी, नागाळा पार्क येथील राहत्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले.
स्मिता उत्तम खांडेकर (वय १९, रा. महूद, ता. सांगोला, जि. सोलापूर) असे तिचे नाव आहे. स्मिताने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक विद्या जाधव यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आत्ताच आम्ही कारण स्पष्ट करू शकत नसल्याचे सांगितले.
दरम्यान, स्मिताच्या मैत्रिणी तिची चेष्टामस्करी करीत होत्या. रविवारीही कॉलेजला सुटी असल्याने दिवसभर त्या तिला चिडवत होत्या. या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची चर्चा घटनास्थळी होती. त्या कोणत्या विषयावर तिची चेष्टा करीत होत्या, याबाबतचे कारण मात्र समजू शकलेले नाही.
याबाबत पोलिसांनी सांगितले, स्मिता हिने दहावीनंतर विवेकानंद कॉलेजमध्ये अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. ती वारणा कॉलनी येथील सचिन पांडुरंग चव्हाण यांच्या ‘लक्ष्मी विरार’ इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीमध्ये भाड्याने राहत होती. तिच्या शेजारी तिच्याच गावातील दहा-बारा मुलीही राहत होत्या.
सोमवारी सकाळी तिच्या खोलीचा दरवाजा उघडला नसल्याने शेजारी राहणाऱ्या मुलींनी तिच्या खोलीचा दरवाजा ठोठावून तिला हाक मारली. परंतु आतून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांना शंका आली. घरमालक सचिन चव्हाण यांना या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी शाहूपुरी पोलिसांना वर्दी दिली.
पोलिसांनी घटनास्थळी येऊन दरवाजा मोडून आतमध्ये पाहिले असता तिने सिलिंग फॅनला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले.
साहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव यांनी तिचा मोबाईल ताब्यात घेऊन आई-वडिलांशी संपर्क साधून त्यांना कोल्हापूरला बोलावून घेतले. तत्पूर्वी त्यांनी तिच्या शेजारी राहणाऱ्या मैत्रिणींकडे चौकशी केली. तिच्या मोबाईलवर शेवटचा कॉल कोणाचा होता, याचीदेखील माहिती घेतली.
सायंकाळी पाचच्या सुमारास तिचे आई-वडील कोल्हापुरात आले. त्यांनी सीपीआरच्या शवविच्छेदन विभागात मुलीचा मृतदेह पाहून आक्रोश केला. त्यानंतर ते मृतदेह घेऊन गावी परतले. तिच्या आई-वडिलांना पोलिसांनी आज, मंगळवारी कोल्हापूरला परत बोलाविले आहे. त्यामुळे या घटनेमागे काहीतरी गंभीर कारण असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (प्रतिनिधी)
उपाशीपोटी आत्महत्या
स्मिता रविवारी रात्री जेवणाचे ताट घेऊन खोलीमध्ये गेली होती. यावेळी तिच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता. सकाळी खोलीमध्ये ते ताट तसेच होते. त्यावरून तिने जेवणही केले नसल्याचे स्पष्ट झाले.