वडगावात महाविद्यालयीन तरुण अपघातात ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:28 AM2021-05-25T04:28:13+5:302021-05-25T04:28:13+5:30
पेठवडगाव : येथे तुकाई मंदिरासमोर सायंकाळी मोटारसायकल व टँकर अपघातात महाविद्यालयीन तरुण जागीच ठार झाला. अभिजित धोंडीराम कदम ...
पेठवडगाव : येथे तुकाई मंदिरासमोर सायंकाळी मोटारसायकल व टँकर अपघातात महाविद्यालयीन तरुण जागीच ठार झाला. अभिजित धोंडीराम कदम (वय २३, मूळ रा. जुना किणी रोड, वडगाव) असे त्याचे नाव आहे. याबाबतची नोंद करण्याचे काम वडगाव पोलीस ठाण्यात सुरू होते.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अभिजित हा मोटारसायकलवरून भादोले हद्दीतील शेताकडे निघाला होता. दरम्यान, वडगाव - भादोले रस्त्यावर त्याच्या मोटारसायकलचा (एमएच ०९ ईडी १३४) आणि टँकर (एमएच ०९ ईएम १५७१) समोरासमोर अपघात झाला. यामध्ये अभिजितच्या डोक्यावरून टँकरच्या मागील क्लिनर बाजूचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नवे पारगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
अपघातानंतर वाहतूक वॉर्डन अजय ढाले यांनी गाडी व कपड्यांवरून पोलिसांनी त्याच्या नातेवाइकांशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली. अभिजित हा मनमिळाऊ स्वभावाचा कष्टाळू तरुण होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. याबाबत फिर्याद सुरेश कदम यांनी पोलिसात दिली आहे. याबाबत चालक रमेश केसरकर यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
फोटो : २४ अभिजित कदम