शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालये दोन मार्चपासून भरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 12:42 PM2022-01-28T12:42:02+5:302022-01-28T12:42:30+5:30

मंगळवार (दि. १ फेब्रुवारी) पासून पदवी प्रथम वर्षाच्या हिवाळी सत्रातील ऑनलाईन परीक्षा सुरू होणार

Colleges under Shivaji University jurisdiction will be filled from March 2 | शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालये दोन मार्चपासून भरणार

शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालये दोन मार्चपासून भरणार

googlenewsNext

कोल्हापूर : कोरोना, ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव कमी असलेल्या ठिकाणी मंगळवार (दि. १ फेब्रुवारी) पासून महाविद्यालये सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. मात्र, शिवाजी विद्यापीठाच्या यंदाच्या शैक्षणिक वर्षातील पहिले सत्र दि. २४ जानेवारी संपले असून, महाविद्यालयांना सुटी सुरू झाली आहे. दुसरे सत्र दि. २ मार्च रोजी सुरू होणार आहे. त्यामुळे या दिवसापासून विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील महाविद्यालये भरणार आहेत.

कोरोना, ओमायक्रॉन वाढू लागल्याने शासनाच्या सूचनेनुसार शिवाजी विद्यापीठातील अधिविभाग आणि संलग्न महाविद्यालयांमधील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे वर्ग दि. ७ जानेवारीपासून ऑनलाईन भरण्यास सुरू झाले. गेल्या तीन दिवसांपूर्वी इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा ऑफलाईन सुरू झाल्या. त्याच दिवशी शासनाने दि. १ फेब्रुवारीपासून महाविद्यालये ऑफलाईन सुरू करण्यास परवानगी दिली. पण, विद्यापीठाचे पहिले शैक्षणिक सत्र या वर्षी दि. १ ऑक्टोबरपासून सुरू झाले. हे सत्र दि. २४ जानेवारीला संपले.

त्याच्या दुसऱ्या दिवसापासून महाविद्यालयांना सुटी सुरू झाली असून, ती १ मार्चपर्यंत आहे. त्यामुळे शासनाने जरी वर्ग ऑफलाईन भरविण्यास परवानगी दिली असली, तरी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील वर्ग प्रत्यक्षात दि. २ मार्चपासून भरणार आहेत. महाविद्यालयांतील वर्ग भरणार नसले, तरी मंगळवार (दि. १ फेब्रुवारी) पासून पदवी प्रथम वर्षाच्या हिवाळी सत्रातील ऑनलाईन परीक्षा सुरू होणार आहेत. त्या दि. १५ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहेत.

१८६०० विद्यार्थ्यांचे लसीकरण

विद्यापीठ कार्यक्षेत्रातील १३३ अनुदानित महाविद्यालयांत या वर्षी एकूण ९८५८० विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत. त्यांपैकी १८ वर्षांवरील एकूण १८६०० विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यात १५३०५ विद्यार्थ्यांनी पहिला, तर ३२९५ विद्यार्थ्यांनी दुसरा डोस घेतला आहे, अशी माहिती कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. हेमंत कठरे यांनी दिली.

पदवी प्रथम वर्षाच्या परीक्षा मंगळवारपासून ऑनलाईन स्वरूपात सुरू होणार आहेत. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालये दि. २ मार्चपासून ऑफलाईन भरणार आहेत. - डॉ. व्ही. एम. पाटील, सचिव, शिवाजी विद्यापीठ प्राचार्य असोसिएशन

Web Title: Colleges under Shivaji University jurisdiction will be filled from March 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.