महाविद्यालये घेणार पदवी प्रथम वर्षाच्या परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:25 AM2021-03-10T04:25:31+5:302021-03-10T04:25:31+5:30
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या विविध विद्याशाखेतील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या लेखीपरीक्षा महाविद्यालयांनी कोरोना नियमांचे पालन करून दि. २२ मार्च ...
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या विविध विद्याशाखेतील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या लेखीपरीक्षा महाविद्यालयांनी कोरोना नियमांचे पालन करून दि. २२ मार्च ते २२ एप्रिल दरम्यान घेण्याबाबतचे नियोजन करावे. या परीक्षा सुरू होण्यापूर्वी महाविद्यालयांनी प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याची कार्यवाही पूर्ण करावी, अशा विविध शिफारसी विद्या परिषद सदस्य डॉ. मेघा गुळवणी यांच्या अध्यक्षतेखालील विद्यापीठ परीक्षा नियोजन समितीने मंगळवारी केल्या.
पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या हिवाळी सत्रातील परीक्षांच्या नियोजन गुळवणी समितीने गेल्या महिन्यात केले. त्यानंतर यंदाच्या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्षाच्या परीक्षांच्या नियोजनाबाबत या समितीची मंगळवारी दुपारी चार ते सायंकाळी सहा यावेळेत विद्यापीठामध्ये बैठक झाली. त्यामध्ये प्रथम वर्षांच्या परीक्षेचा कालावधी, त्यासाठीच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप आदींबाबत चर्चा करून या समितीने विविध शिफारसी विद्यापीठ प्रशासनाला केल्या. त्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील संलग्नित २९३ महाविद्यालयांनी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन अथवा ऑफलाइन पद्धतीने घ्याव्यात. त्यांची प्रश्नपत्रिका तयार करणे, त्यांचे मूल्यांकन करून निकाल जाहीर करण्यासाठी विद्यापीठाच्या संगणकप्रणालीमध्ये गुणांची नोंद करणे आदी जबाबदारी महाविद्यालयांनी पार पाडावी. पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या परीक्षा अधिविभाग, महाविद्यालयांनी त्यांच्या पातळीवर घ्याव्यात यांचा समावेश आहे. या बैठकीस डॉ. मेघा गुळवणी, पी. बी. चव्हाटे, एस. बी. भांबर, एच. एन. मोरे आदी उपस्थित होते.
चौकट
प्रश्नपत्रिकेचे ‘एमसीक्यू’ स्वरूप
हिवाळी सत्रातील परीक्षांप्रमाणे प्रथम वर्षाच्या परीक्षांसाठी ५० गुणांसाठी बहुपर्यायी (एमसीक्यू) स्वरूपातील २५ प्रश्नांचा पेपर (प्रश्नपत्रिका) असणार आहे. प्रकल्प, तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा महाविद्यालयांनी त्यांच्या पातळीवर घ्यावी. प्रथम वर्षाच्या विविध ३४ परीक्षा होतील. त्यासाठी साधारणत: ६० हजार परीक्षार्थी असणार आहेत.
प्रतिक्रिया
गेल्या चार वर्षांपासून प्रथम वर्षाच्या परीक्षा महाविद्यालयांकडून घेतल्या जात आहेत. त्यामुळे या परीक्षा घेण्यास महाविद्यालये सक्षम आहेत. त्याआनुंषगाने यंदाच्या शैक्षणिक वर्षांतील परीक्षा घेण्याबाबतच्या विविध शिफारसी आमच्या समितीने विद्यापीठ प्रशासनाला केल्या आहेत. पदव्युतर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या परीक्षांचे नियोजन ‘नॅक’मूल्यांकनानंतर केले जाईल.
-डॉ. मेघा गुळवणी, अध्यक्ष, विद्यापीठ परीक्षा नियोजन समिती
चौकट
अध्यापन पूर्ण करावे
अभ्यास मंडळांनी यंदा पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम कमी केला असला, तरी संलग्नित महाविद्यालये, विविध अधिविभागांनी अध्यापन पूर्ण करावे, असा निर्णय अधिकारमंडळांनी घेतला आहे. त्याबाबत महाविद्यालये, अधिविभागांना सूचना केली असल्याची माहिती प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी मंगळवारी दिली.