निपाणी मतदार संघात काँग्रेस-भाजपात टक्कर
By admin | Published: February 11, 2016 10:39 PM2016-02-11T22:39:52+5:302016-02-11T23:44:21+5:30
नेत्यांची प्रतिष्ठा पणाला : तालुका आणि जिल्हा पंचायत निवडणूक, प्रचाराची रणधुमाळी समाप्त
निपाणी : निपाणी तालुका आणि जिल्हा पंचायतीसाठी १३ रोजी मतदान होत आहे. अर्जदाखल करण्यापासून घरोघरी पदयात्रेने प्रचार यंत्रणा जोरदारपणे राबविण्यात आली. तरी प्रचाराच्या आखेरच्या टप्प्यात भाजप आणि काँग्रेसच्या मोठ्या सभा झाल्या. प्रचारासाठी कमी कालावधी असल्याने शेवटच्या टप्प्यातील दोन दिवसांत रणधुमाळी उडाली. या मतदार संघात काँग्रेस आणि भाजप यांच्यात टक्कर होणार आहे.
निपणी मतदार संघात जिल्हा पंचायतीच्या चार आणि तालुका पंचायतीच्या २१ भागांसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये निखराची लढाई लागली आहे. गतवेळच्या तालुका आणि जिल्हा पंचायत निवडणुकीत दोन्ही ठिकाणी भाजपने आपले वर्चस्व निर्माण केले होते. ही भाजपच्या विजयाची परंपरा यंदा खंडित करण्यासाठी काँग्रेसचे नेते मंडळी रात्रंदिवस झटत आहेत. तर भाजपची विजयाची घौडदौड चालू ठेवण्यासाठी भाजप आमदारांसह नेतेमंडळींनी चांगलीच कंबर कसली आहे. भाजपच्या उमेदवारांच्या विजयांसाठी केंद्रीय रसायनमत्री अनंतकुमार यांनी बेनाडी येथे भव्य सभा घेऊन राजकीय ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
काँग्रेसच्या उमेदवारांच्या विजयासाठी माजी आमदार वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण पिंगळे यांनी मतदार संघातील मोठ्या गावांत प्रचार सभा घेतल्या, तर भाजप उमेदवारांच्या विजयासाठी आमदार शशिकला जोल्ले, माजी आमदार सुभाष जोशी, सहकार नेते आण्णासाहेब जोल्ले यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचारसभा आणि पदयात्रा काढून चांगले वातावरण निर्माण केले आहे. तालुका आणि जिल्हा पंचायत निवडणूक ही विधान सभा निवडणुकीसाठी महत्त्वाची असल्याने काँग्रेस आणि भाजप नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोन्ही पक्षांतर्फे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले नसले, तरी विकासकामांचा मुद्दा प्राचारात वापरला गेला आहे.
निपाणी विधानसभा मतदार संघातील कोगनोळी जिल्हा पंचायत मतदार संघ हा काँगे्रसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. तो टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली आहे. तर बालेकिल्ल्याला खिंडार पाडून विजयाचा झेंडा फडकविण्यासाठी भाजप नेत्यांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबविली आहे. सर्वच मतदार संघात दोन्ही पक्षांनी तुल्यबळ उमेदवार उतरविल्याने निपाणी मतदार संघाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जाहीर प्रचार संपला असला तरी छुप्या प्रचाराने वेग घेतला आहे. शनिवारी
(दि. १३) मतदान, तर २३ ला निकाल जाहीर होणार आहे. (प्रतिनिधी)