अज्ञात वाहनाची धडक, कोल्हापूर विमानतळावरील बॅरियर कोसळला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 01:32 PM2024-11-08T13:32:25+5:302024-11-08T13:32:35+5:30
पुन्हा नव्याने उभारणी करण्यासाठी यंत्रणा
उचगाव : उजळाईवाडी, तामगाव-नेर्ली, हालसवडे या महामार्गावर कोल्हापूरविमानतळ प्रशासनाने बॅरियर बसवला होता. अज्ञात वाहनाची धडक बसून तो कोसळला. बॅरियरसाठीचे साहित्य निकृष्ट दर्जाचे वापरल्याने असा प्रकार समोर आला आहे.
कोल्हापूरविमानतळ परिसरात उंची नियंत्रित हाईट बॅरियर विमानतळाच्या धावपट्टीजवळून अवजड वाहनांचा प्रवास रोखण्यासाठी वापरण्यात आला आहे. उजळाईवाडी, नेर्ली, तामगाव आणि औद्योगिक वसाहतीकडून कोल्हापूर रस्त्यावर हलक्या व अवजड वाहनांची वाहतूक बारमाही सुरू आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. विमानतळ प्राधिकरण आणि डीजीसीएने रस्त्याची मागणी केली आहे. लवकरच सार्वजनिक बांधकाम विभागाशी समन्वय साधून पुन्हा नव्याने उभारणी करण्यात येणार असल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले.
पर्यायी रस्त्याची आवश्यकता आणि भूसंपादनाचा अडथळा
पर्यायी रस्ता सुदर्शन पेट्रोलपंप येथून धावपट्टीपासून दूर अंतरावरून विमानतळाच्या कंपाउंडला लागून गोकुळ शिरगाव, उजळाईवाडी, नेर्ली, तामगाव असा प्रस्तावित आहे. परंतु, स्थानिक मिळकतधारक व शेतकऱ्यांच्या विरोधामुळे भूसंपादन रखडले असून रस्त्याचे काम पूर्ण होत नाही.
विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने विमानतळाच्या हद्दीमध्ये अवजड वाहनांचा प्रवेश रोखणे गरजेचे असून यासाठी हाईट बॅरियर बसविण्यात आला असून अज्ञात वाहनाच्या धडकेत पश्चिमेकडील बॅरियर कोसळला असल्यास तो सार्वजनिक बांधकाम विभागाशी समन्वय साधून लवकरच दुरुस्त करून बसविण्यात येणार आहे. -अनिल शिंदे, संचालक, कोल्हापूर विमानतळ