‘डॉल्बी’मुळे नोकरीवर गंडांतर

By admin | Published: August 14, 2016 12:52 AM2016-08-14T00:52:58+5:302016-08-14T01:00:51+5:30

राजारामपुरीतील तरुण : राष्ट्रीय खेळाडूच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह - लोकमतइनिशियटिव्ह

The collocation of the job due to the 'Dolby' | ‘डॉल्बी’मुळे नोकरीवर गंडांतर

‘डॉल्बी’मुळे नोकरीवर गंडांतर

Next

एकनाथ पाटील -- कोल्हापूर --पोलिस प्रशासनाचा विरोध डावलून सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीत डॉल्बी लावून जल्लोष करण्याचा मोह कसा अंगलट येऊ शकतो याचे प्रत्यंतर येथील एका तरुणास आले आहे. अपंग आरक्षणामध्ये महापालिकेत लिपिक पदावर निवड झालेल्या राजारामपुरीतील राष्ट्रीय खेळाडूवर डॉल्बीच्या ध्वनिमर्यादा उल्लंघनाचा गुन्हा दाखल असल्याने शासकीय नोकरी गमाविण्याची वेळ आली आहे.
महानगरपालिका प्रशासनाने त्याच्याकडे चारित्र्य पडताळणी दाखल्याची मागणी केली आहे. डॉल्बीच्या गुन्ह्यात अडकलेल्या या खेळाडूला राजारामपुरी पोलिसांनी दाखला देण्यास नकार दिला आहे. गेल्या तीन वर्षांत डॉल्बीबद्दलच्या गुन्ह्यात अडकलेल्या तरुणांना कारकिर्दीच्या उंबरठ्यावर चटके बसू लागल्याने त्यांच्यासह पालकांना चिंता लागली आहे.
राष्ट्रीय स्तरावर बॉक्सिंगमध्ये विविध पदके मिळविलेल्या राजारामपुरीतील खेळाडूची महापालिकेत लिपिक पदावर निवड झाली. त्याला नियुक्तीपत्र देण्यापूर्वी प्रशासनाने त्याच्याकडे पोलिसांकडून दिल्या जाणाऱ्या चारित्र्य पडताळणी दाखल्याची मागणी केली. दाखला आणण्यासाठी तो राजारामपुरी पोलिस ठाण्यात गेला. तेथील कर्मचाऱ्याने संगणकावर त्याचे नाव शोधले असता डॉल्बीबद्दलच्या गुन्हयामध्ये तो सहभागी असल्याचे दिसून आले. त्यावर पोलिसांनी त्याला त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याने दाखला देता येत नसल्याचे सांगितले. किरकोळ गुन्हा आपली कारकिर्द उद्ध्वस्त करू शकतो, याची जाणीव त्या तरुणाला झाली. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन दाखला मिळविण्यासाठी गेली पंधरा दिवस तो हेलपाटे मारत आहे. हा दाखला न मिळाल्यास त्याच्या हाती आलेल्या नोकरीवर पाणी फिरणार आहे.

शिक्षा अशी..
डॉल्बीविषयीच्या गुन्ह्यातील सहभाग सिध्द झाल्यास पाच वर्षे कारावासाची शिक्षा व तीन लाख रुपये दंड अशा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.


पासपोर्टसाठीही अडचणी..
शहरातील आणखी काही उच्चशिक्षित तरुणांना परदेशात नोकरीची संधी प्राप्त झाली आहे. त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र व चारित्र्य पडताळणी दाखला मुलाखतीला घेऊन येण्याची सक्ती केली जाते. या तरुणांनी संबंधित पोलिस ठाण्यांकडे अर्ज करून चारित्र्य पडताळणी दाखल्याची मागणी केली असता त्यांच्यावर डॉल्बीबद्दलचे गुन्हे दाखल असल्याने पोलिस दाखला देण्यास नकार देत आहेत. डॉल्बीच्या गुन्ह्यामुळे नोकरीची संधी हुकलीच; त्याचबरोबर पासपोर्टही काढता न आल्याने अनेकांच्या अडचणीत भर पडली आहे.
तरुणांवर डॉल्बीचे गुन्हे मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहेत. पासपोर्ट, शासकीय, निमशासकीय नोकरीत हजर होताना त्यामुळे अडचणी निर्माण होऊन बहुसंख्य तरुणांच्या भविष्याचे नुकसान होऊ शकते. आज ज्या तरुणांवर नोकरी गमाविण्याची वेळ आली, ती भविष्यात आपल्यावरही येऊ शकते.
- भारतकुमार राणे, कोल्हापूर शहर पोलिस उपअधीक्षक

Web Title: The collocation of the job due to the 'Dolby'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.