प्रचाराची रंगत पोहोचली टिपेला
By Admin | Published: October 28, 2015 12:10 AM2015-10-28T00:10:58+5:302015-10-28T00:18:22+5:30
महापालिका निवडणूक : आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी; शिजतेय महागाईची ‘डाळ’
कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीचा जाहीर प्रचार आता खऱ्या अर्थाने अंतिम टप्प्यात पोहोचला असून आरोप- प्रत्यारोपांच्या तोफगोळ्यांमुळे सर्वच राजकीय पक्षांचे नेते घायाळ व्हायला लागले आहेत. महापालिकेतील भ्रष्टाचारापासून काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेमधील कमिशनपर्यंत, गुंड-मवाली, मटकेवाल्या उमेदवारांपासून राड्यापर्यंत आणि भाजपच्या अकार्यक्षमपणापासून ते तूरडाळीच्या वाढलेल्या किमतीपर्यंत सर्व मुद्दे प्रचारसभांतून चर्चेत आले आहेत; परंतु सुरुवातीच्या टप्प्यात दिलेले विकासाचे जाहीरनामे मात्र या आरोपांच्या फैरीमुळे मागे पडायला लागले आहेत.
भारतीय जनता पक्षाने यापूर्वी ‘भ्रष्टाचारमुक्त कारभार’ या विषयावर चर्चा करताना महापालिकेतील बरेच घोटाळे प्रचारसभांतून मांडले; परंतु पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी एका कार्यक्रमात काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेतील कमिशनचा नवीनच मुद्दा प्रकर्षाने पुढे आणला आहे. या योजनेत भ्रष्टाचार झाल्याची चर्चा यापूर्वी कधी झाली नव्हती, पण प्रथमच पालकमंत्री पाटील यांनी हा विषय बाहेर काढला. त्यामुळे गडबडलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या अनुक्रमे सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांनी चौकशी कराच, असे आव्हान देत कसलाही भ्रष्टाचार झाला नसल्याचा खुलासा केला.
सोमवारी राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि ताराराणी आघाडीच्या कारभाऱ्यांमध्येत राडा झाल्याने शिवसेनेसह कॉँग्रेस पक्षाला आयतेच कोलित मिळाले.
ताराराणी आघाडीचे कारभारी हे गुंड प्रवृत्तीचे असल्याचे आधीपासून आक्षेप घेतला जात होता, त्याला राड्यामुळे आयतेच बळ मिळाले. दहशत पसरविण्याचा या प्रकाराचा मुद्दा आता शिवसेना आणि काँग्रेसकडून उचलून धरण्यात येत आहे. पुढचे दोन दिवस तरी हा विषय चांगलाच गाजणार आहे.
तुरीची डाळ शिजणार का ?
महानगरपालिका निवडणूक आणि राज्यातील महागाई याचा तसा खूप मोठा संबंध नाही. महागाईला भाजप-शिवसेनेचे सरकार जबाबदार आहे; परंतु विकासाच्या मुद्द्यांपेक्षा हाच मुद्दा सध्या अधिक चर्चेत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीने एकही संधी न सोडता महागाईचा विषय अत्यंत चपलखपणे लावून धरला आहे. ज्यांनी महागाई वाढविली, डाळीच्या किमती वाढविल्या त्यांच्या हातात महपालिकेची सत्ता देणार का, असा सवाल जनतेला विचारला जात आहे. जाहीर प्रचाराची मुदत शुक्रवारी संपत आहे, त्यामुळे आणखी दोन दिवस तरी जाहीर सभांतून आरोप-प्रत्यारोपांचे हे तोंडसुख घेतले जाईल.
भाजपच सर्वांचे टार्गेट
या निवडणुकीत आतापर्यंतच्या प्रचारात भारतीय जनता पक्ष आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनाच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आदींनी टार्गेट केले आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीने भाजपसह शिवसेनेवरसुद्धा टीका केली होती; परंतु यावेळी मात्र शिवसेनेवर कोणीही टीका केलेली नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी हे भाजपचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असले तरी शिवसेना हा राज्यातील व केंद्रातील सत्तेतील भागीदार आहे; परंतु यावेळी भाजपने ताराराणी आघाडीबरोबर युती करून शिवसेनेला धोबीपछाड केल्याने शिवसैनिकही संतप्त झाले असून त्यांनी भाजपला टार्गेट केले आहे.
उमेदवारांची उडाली धांदल
शेवटचे दोन दिवस प्रचारासाठी उरले असल्याने प्रचारात गुंतलेल्या सर्वच पक्षांच्या उमेदवारांची तसेच त्यांच्या समर्थकांची धांदल उडाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून निर्माण केलेले प्रचाराचे वातावरण कायम ठेवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. पदयात्रा, व्यक्तिगत गाठीभेटीबरोबरच प्रचारातील सर्वप्रकारच्या पद्धतीचा अवलंब केला जात आहे. कार्यकर्त्यांच्या मर्जी सांभाळण्यापासून ते मतदारांना आकर्षित करण्यापर्यंत सर्वप्रकारच्या मेहरबान्या उमेदवारांना कराव्या लागत आहेत तसेच प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या हालचालींवर एकमेकांच्या नजरा खिळल्या आहेत.