‘राजाराम’च्या निवडणुकीत रंगत वाढली
By admin | Published: March 29, 2015 10:04 PM2015-03-29T22:04:04+5:302015-03-30T00:26:56+5:30
सात तालुक्यांत सभासद : कारखाना कार्यक्षेत्रातील गावागावांत उडाला प्रचाराचा धुरळा, लढत ठरतेय प्रतिष्ठेची
रमेश पाटील - कसबा बावडा आरोप-प्रत्यारोपाने गाजत असलेल्या आणि संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा बावडा (ता. करवीर) येथील राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीची चुरस आता वाढतच चालली आहे. सात तालुक्यांतील १२२ गावांतल्या प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आमदार महादेवराव महाडिक आणि माजी मंत्री सतेज पाटील गटाकडून होताना दिसत आहे. ‘आता नाही, तर कधीच नाही’ या इराद्याने दोन्ही गटांकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली जात आहे.
‘राजाराम’ची ७ सप्टेंबर २०१४ ला सन २०१३/१४ ची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेत ‘राजाराम’ची निवडणूक बिनविरोध करा, असा सूर काही सभासदांनी लावला होता. हा धागा पकडत ‘राजाराम’ची निवडणूक केव्हाही होऊ दे, आपल्याला चिंता नाही, असे वक्तव्य आमदार महाडिक यांनी केले होते. त्याचवेळी सतेज पाटील गटाकडून कोणत्याही हालचाली ‘राजाराम’साठी सुरू नव्हत्या. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होईल, असे चित्र सत्तारूढ गटाकडून रंगवले गेले. प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळेच होते. सतेज पाटील गटाकडून ‘राजाराम’च्या निवडणुकीची तयारी सुरूच होती. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कच्चा-पक्क्या याद्या तयार करण्याच्या सूचना मिळाल्यानंतर सतेज पाटील गटाच्या हालचाली अधिकच जोरात सुरू झाल्या.
प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाने कच्ची मतदार यादी तयार करून प्रसिद्ध केल्यानंतर या यादीवर सतेज गटाकडून हरकती घेण्यात आल्या. यामध्ये तब्बल १३ तक्रारी होत्या. या सर्व तक्रारी फेटाळण्यात आल्या होत्या. या तिघांविरुद्ध विश्वास नेजदार यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली.
पुन्हा या यादीवर सुनावणी होऊन कारखान्याने वाढीव केलेल्या १९३ सभासदांचे सभासदत्व साखर संचालक वाय. व्ही. सुर्वे यांनी रद्द केले. त्यामुळे सत्तारूढ गटाला धक्का बसला. तत्पूर्वी, आमदार महाडिक व त्यांचे पुत्र अमल महाडिक हे बेडकीहाळच्या व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्ट या खासगी कारखान्याचे संचालक आहेत. सहकार कायद्याप्रमाणे एका व्यक्तीस दोन कारखान्याचे संचालक होता येत नाही. त्यामुळे त्यांचे संचालकपद रद्द करावे, अशी मागणी प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्याकडे करण्यात आली होती. परंतु, व्यंकटेश्वरा पॉवरचे आमदार महाडिक व अमल महाडिक संचालक नाहीत, असा कारखान्याकडून खुलासा करण्यात आला होता.
राजाराम कारखाना अर्ज छाननीवेळी आमदार महादेवराव महाडिक यांच्या अर्जावर विश्वास नेजदार व विद्यानंद जामदार यांनी हरकत घेतली. आमदार महाडिक कोल्हापूर अर्बन बँकेला एका सभासदाला जामीनदार आहेत आणि हे कर्ज थकले आहे. त्यामुळे त्यांचा अर्ज रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, आमदार महाडिक यांच्या वतीने कर्ज भरल्याची कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यांचा अर्ज पात्र ठरला.
बावड्यात झालेल्या सतेज पाटील गटाच्या मेळाव्यात तर आमदार महाडिक यांच्या कारभारावर चौफेर हल्ला चढविण्यात आला होता. आता या चौफेर हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी महाडिक गटाचा बावड्यात मेळावा होणार आहे. आमदार महाडिक आणि सतेज पाटील या दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.
‘राजाराम’च्या निवडणुकीसाठी अद्याप अर्ज माघार घेण्याची ८ एप्रिलपर्यंत मुदत आहे. या कालावधीमध्ये कोण उमेदवार माघार घेत आहे, कोण नाही याकडे दोन्ही गट लक्ष ठेवून आहेत. विरोधी गटाच्या एखाद्या उमेदवाराने माघार घेतल्यास त्याला आपल्याकडे वळविण्याचे प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. किंवा एखाद्या उमेदवाराने दबावाला बळी पडून माघारी घेऊ नये, यासाठी त्याची पाठराखण केली जाण्याची शक्यता आहे.
‘राजाराम’च्या निवडणुकीच्या निमित्ताने आमदार महाडिक
आणि सतेज पाटील यांच्यातील
संघर्ष पुन्हा एकदा उफाळला
आहे. त्यामुळे गावागावांत प्रचाराचा धुरळा उडत आहे आणि निवडणुकीची रंगत वाढत चालली आहे, हे मात्र निश्चित!