रंग उधळले सामाजिक जाणिवेचे!
By admin | Published: March 28, 2016 11:51 PM2016-03-28T23:51:04+5:302016-03-29T00:01:48+5:30
पाणीविरहित रंगपंचमी उत्साहात : कोरड्या रंगांची उधळण करीत कोल्हापूरकरांचा नवा आदर्श
कोल्हापूर : लाल, हिरवा, निळा, पिवळा, गुलाबी... अशा विविध कोरड्या रंगांची उधळण करत कोल्हापूरकरांनी रंगपंचमी उत्साहात साजरी केली. सोमवारी सकाळपासून सुरू झालेल्या या रंगोत्सवात शहरातील गल्ली-बोळ, रस्ते आणि नागरिकांची मनेही रंगून गेली. भले ही उधळण कोरड्या रंगांची असू दे; असे म्हणत आबालवृद्धांनी दैनंदिन आयुष्यात येणारा ताण-तणाव विसरून रंगपंचमीचा आनंद लुटला.
राज्यात दुष्काळाचे सावट व पाणीटंचाई आहे. या पार्श्वभूमीवर कोरड्या रंगांनी रंगपंचमी खेळण्याच्या आवाहनाला युवा वर्गाने भरभरून प्रतिसाद दिला. गेल्या दोन-तीन दिवसांपासूनच शहरात विविध प्रकारच्या पिचकाऱ्यांना फाटा देत कोरड्या रंगांची खरेदी केली जात होती. रंगपंचमीच्या पूर्वसंध्येलाच शहरात सर्वत्र रंगांची उधळण सुरू झाली. दहावीचा संस्कृतचा शेवटचा पेपर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनीही मोठ्या प्रमाणात कोरडे रंग उधळत रंगपंचमी साजरी केली.
सोमवारची सकाळ उजाडलीच ती रंगांची उधळण करत. अंथरुणातून उठलेली बच्चेकंपनी थेट पिवडीचे गुलाबी, पिवळे, हिरवे रंग घेऊन घराबाहेर धावली. आई-वडील, बहीण-भाऊ अशी सगळी नाती या रंगांनी पुन्हा एकदा प्रेमाच्या रंगात रंगली. कुटुंबातील सगळ्या सदस्यांनी एकमेकांना रंग लावून नात्याचे रंग गहिरे केले. महिला-पुरुष हातात रंगांच्या, पिवडीच्या पिशव्या घेऊन शेजारी-नातेवाइकांना रंगवत निघाले. सगळीकडे रंगांची उधळण होत असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट होता; पण जागोजागी तरुणांचे, मंडळांचे जथ्थेच्या जथ्थे रंग खेळत होते. दुचाकींवरून मित्रांना रंगवायला जात होते. त्यामुळे शहरातील असा एकही रस्ता, गल्ली-बोळ शिल्लक राहिला नाही, जिथे रंग नव्हता. महाविद्यालयांसमोरही रंगपंचमी खेळण्यात आली.
एकीकडे प्रत्यक्षात रंगपंचमी खेळली जात होती, तर दुसरीकडे व्हॉट्स अॅपवरही रंगांची बरसात होत होती. सगळे एकमेकांना रंगपंचमीच्या शुभेच्छा देत होते. त्यात विशेष म्हणजे ‘पाणी वापर टाळा’ असे संदेश एकमेकांना धाडले जात होते. अनेक कॉलेज गु्रपनी कोरड्या रंगांना अधिक पसंती दिली.
रंगोत्सवात तरुणींनीही आघाडी घेतली होती. त्या सकाळपासून दुचाकी व चारचाकींमधून जात मैत्रिणींना कोरड्या रंगात न्हावू घालत होत्या. (प्रतिनिधी)
ेयांचा प्रतिसाद लाखमोलाचा
‘केशवराव भोसले रंगकर्मी मित्र, केशवराव भोसले कट्टा मित्रमंडळ, खाऊ गल्ली व्यापारी मित्र-फिल्म वर्कस युनियन आणि कोल्हापूरकर मित्रमंडळ यांनी केशवराव भोसले नाट्यगृहासमोर ‘प्लीज... वाचा वेळ काढून थोडसं...’ असा मोठा बोर्ड लिहून पाणी वाचविण्याचा आग्रह केला होता; तर जलदेवतेची पूजा करून येणाऱ्या हिरव्या, भगव्या, आदी रंगांचा टिळा लावला जात होता. यासह येणाऱ्यांना लाडू प्रसादही दिला जात होता. त्यामध्ये ‘भलेही उधळण कोरड्या रंगांची... नांदी उद्याच्या जलपूर्ण कोल्हापूरची... !’ असा संदेश दिला.
हिंदू युवा प्रतिष्ठानने तर रंगपंचमी खेळण्यापेक्षा सात फूट बाय सात फूट आकाराचे दहा कोरे फ्लेक्स लावून त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना मनाला येईल ते चित्र, अक्षरे, संदेश लिहिण्यासाठी विविध जलरंग, ब्रश उपलब्ध करून दिले होते. त्यात अनेकांनी कविता, पाणी वाचविण्याचे संदेश लिहिले होते, तर व्यंगचित्रकार सिराज मुजावर यांनी काही व्यंगचित्रे काढली. राधिका पडवळे, राधिका उचगावकर यांनी मेहंदी काढली, तर अशोक लोहार यांनी रांगोळी काढत अनोखी रंगपंचमी साजरी केली. या उपक्रमासाठी अशोक देसाई, ज्ञानदेव पुंगावकर, संजय ढाले, महेश इंगवले, वल्लभ देसाई, राजेंद्र सूर्यवंशी, नगरसेवक अजित ठाणेकर, शेखर कुसाळे, मराठा महासंघाचे वसंत मुळीक, अनिल चौगुले यांनी परिश्रम घेतले.