कोल्हापुरात रंगीबेरंगी पतंग महोत्सवास उत्साही सुरुवात, विदेशी पतंगांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 06:03 PM2018-11-10T18:03:23+5:302018-11-10T18:04:40+5:30
बाबाराजे महाडिक पतंगप्रेमी व जिल्हा केमिस्टस असोसिएशनतर्फे ताराबाई रोडवरील महालक्ष्मी धर्मशाळा येथे आयोजित केलेल्या देशी-विदेशी पतंग महोत्सवाचे उद्घाटन महापौर शोभा बोंद्रे यांच्या हस्ते व माजी महापौर हसिना फरास यांच्या उपस्थितीत शनिवारी मोठ्या उत्साहात झाले.
कोल्हापूर : बाबाराजे महाडिक पतंगप्रेमी व जिल्हा केमिस्टस असोसिएशनतर्फे ताराबाई रोडवरील महालक्ष्मी धर्मशाळा येथे आयोजित केलेल्या देशी-विदेशी पतंग महोत्सवाचे उद्घाटन महापौर शोभा बोंद्रे यांच्या हस्ते व माजी महापौर हसिना फरास यांच्या उपस्थितीत शनिवारी मोठ्या उत्साहात झाले.
यंदाच्या पतंग महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे यात स्पायडरमॅन, गरुड, मलेशियन क्रोबा, दुबईचे बटरफ्लाय, बीजींगचे घुबड, स्वित्झर्लंडचे विमान, हाँगकाँगचा रोबोट, मॉरिशसचे वटवाघळ... अशा एक ना अनेक आकारांच्या विदेशी पतंग व देशांतील विविध प्रांतांतील सुती मांजांच्या समावेश आहे.
या मांजांमध्ये सुरत, अहमदाबाद, हैदराबाद, औरंगाबाद, नागपूर, दिल्ली, बरेली, पुणे, बिहार, पाटणा, नाशिक, येवला, नाशिक, आदी ठिकाणचा सुती मांजाही प्रदर्शनात मांडण्यात आला आहे. गेल्या नऊ वर्षांपासून बाबाराजे महाडिक पतंगप्रेमी व केमिस्टस असोसिएशन हा पतंग महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात.
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही ५०० हून अधिक पतंग लहान मुलांना वाटण्यात आले; तर महालक्ष्मी धर्मशाळा, निवृत्ती चौक, तटाकडील तालीम मंडळ, पुन्हा धर्मशाळा अशी लहान मुलांची रॅली काढण्यात आली. यात विविध पतंगांचे नमुने घेऊन पतंगप्रेमी सहभागी झाले होते. बाबा महाडिक यांनी स्वागत केले.
यावेळी जिल्हा केमिस्टस असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील, पृथ्वीराज पाटील, विजय अग्रवाल, ‘छावा’चे जिल्हाध्यक्ष राजू सावंत, विजय करजगार, शिवानंद तोडकर, संजय करजगार, मुकुंद धर्माधिकारी, अवधूत अपराध, प्रकाश सरनाईक, भिकाजी निकम, सुरेश सूर्यवंशी, प्रवीण पुजारी, आदी मान्यवर उपस्थित होते.
गेल्या काही वर्षांपासून बाबा महाडिक हे पतंगप्रेमींकरिता स्वखर्चाने पतंग वाटतात. यासह त्यांनी चीनी मांजा पतंगासाठी वापरू नये. त्यातून होणारे धोके, आदींबद्दल जनजागृती करण्यासाठी केवळ देशी प्रकारच्या मांजांचेही प्रदर्शन आयोजित केले आहे. याबद्दलची माहिती स्वत: महाडिक प्रदर्शन पाहण्यास आलेल्या पालक, मुले, नागरिकांना देत आहेत. शनिवार व रविवार असे दोन दिवस हे प्रदर्शन पतंगप्रेमींना पाहता येणार आहे.
कोल्हापुरातील ताराबाई रोडवरील महालक्ष्मी धर्मशाळा येथे बाबाराजे महाडिक पतंगप्रेमी व जिल्हा केमिस्टस असोसिएशनतर्फे भरविण्यात आलेल्या पतंग महोत्सवात देश-विदेशांतील पतंग बालचमूंनी असे न्याहाळले.