रंगपंचमी खेळा नैसर्गिक रंगान
By admin | Published: March 3, 2015 12:18 AM2015-03-03T00:18:35+5:302015-03-03T00:26:10+5:30
निसर्गमित्र संस्थेचा पुढाकार : यंदा ५०० किलो नैसर्गिक रंगांची निर्मिती; सौरचुलीवर सुकविली फुले
कोल्हापूर : रासायनिक रंगांमुळे शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. रंगपंचमी दिवशी नैसर्गिक रंगांचा वापर केल्यास कोणत्याही प्रकारची इजा शरीराला होत नाही. हे नैसर्गिक रंग आपण घरामध्ये सहज तयार करू शकतो. गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या संस्थेच्यावतीने नैसर्गिक रंग वापरण्यासाठी आवाहन करीत आहोत. यंदा पाचशे किलो रंगांची निर्मिती केली आहे. यासाठी लागलेली फुले सौरचुलीवर सुकविण्यात आली आहेत, अशी माहिती निसर्गमित्र संस्थेचे कार्यवाह अनिल चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली. चौगुले म्हणाले, निसर्गमित्रतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून वनस्पतींची पाने, फुले, फळांद्वारे रंग कसा तयार केला जातो याची माहिती प्रात्यक्षिकांद्वारे नागरिकांना देत आहोत. या नैसर्गिक रंगांतून सुगंधी वास तर येतोच, पण त्याचसोबत हे शरीराला घातक नाहीत. निर्माल्यातील फुलांच्या पाकळ्यांचाही वापर करून आपण विविध रंग तयार करू शकतो. यंदा आमच्या संस्थेच्यावतीने आदर्श महिला बचत गट, अधि क्रिएशन व बी वेल इंडस्ट्रीज यांच्या सहकार्याने ५०० किलो रंग तयार करून घेतले आहेत. हे रंग अल्प दरात उपलब्ध आहेत. सात प्रकारच्या विविध रंगांचा यामध्ये समावेश आहे. यावेळी राणिता चौगुले यांनी नैसर्गिक रंग कसे तयार करायचे याचे प्रात्यक्षिक करून दाखविले, तसेच अधिक माहितीसाठी निसर्गमित्रद्वारा बापूसाहेब पाटील, ग्रंथालय, साईक्स एक्स्टेंशन किंवा २८२३/४८ बी वार्ड, महालक्ष्मीनगर येथे संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले. यावेळी सुरेश शिपुरकर, शामराव कांबळे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) विविध वनस्पतींपासून रंगनिर्मिती यामध्ये पळस, पांगारा, काटेसावर, झेंडू, जास्वंद, गलाटा, गुलाब, पारिजातक, धायटी, बाहवा, नीलमोहर, कडुनिंब, मेहंदी, भोकर, पुदिना, शेंद्री, बेलफळ, कुंकुफळ, टाकाळा, कोकम, बेहडा, हिरडा, आवळा, अंजन, बाभूळ, हळद, डाळिंब, बीट, जांभूळ, शेवगा, अर्जुन, कौशी, भिवळा, कुंभा, मंजिष्ठा, नोनी, बिब्बा यांचा समावेश आहे.