पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी राजारामपुरीत ‘मोफत प्लंबर’ सेवा
By Admin | Published: April 1, 2016 01:08 AM2016-04-01T01:08:36+5:302016-04-01T01:32:56+5:30
बाबूराव माने यांचा उपक्रम : कामासाठी दोन प्लंबरांची नियुक्ती
कोल्हापूर : पाणीटंचाईमुळे महाराष्ट्र होरपळत आहे. एक घागर पाण्यासाठी नागरिकांना दाहीदिशा पायपीट करण्याची वेळ आली आहे. पाण्याचे हे महत्त्व लोकांना पटवून देणे आणि वाया जाणाऱ्या थेंब थेंब पाण्याची बचत करण्यासाठी राजारामपुरीमध्ये राहणारे ८१ वर्षीय बाबूराव माने यांनी ‘मोफत प्लंबर’ ही सेवा उपलब्ध करून दिली आहे.
शहरातही पाणीटंचाईची परिस्थिती बिकट आहे. थेंब थेंब पाण्याला महत्त्व आले आहे. मात्र, घरामधील नळगळती, पाईपगळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया जात असते. काही वेळा प्लंबर वेळेत मिळत नसल्याने किंवा धावपळीच्या युगामुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष होत असल्याने पाणी वाया जात असते. हीच बाब बाबूराव माने यांच्या लक्षात आली.
माने यांनी पाण्याचे मोल व ते काटकसरीने वापरले पाहिजे या उद्देशाने आजपासून राजारामपुरीत मोफत प्लंबिंग सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
असा आहे उपक्रम...
हा उपक्रम फक्त राजारामपुरीतील दुसरी ते पंधरावी गल्लीपर्यंत राबविला जाणार आहे. शुक्रवारी या उपक्रमाची सुरुवात दुसरी गल्ली येथील जगदाळे यांच्या बंगल्यापासून होणार आहे. माने यांच्यामार्फत या उपक्रमासाठी दोन प्लंबरची नियुक्ती केली आहे. त्यांच्यामार्फत राजारामपुरीतील घरोघरी जाऊन पाणीगळती थांबविली जाणार आहे. यामध्ये नळ बदलणे, नळदुरुस्ती, किरकोळ गळती काढणे ही सेवा मोफत पुरविली जाणार आहे. नळ किंवा अन्य साहित्य लागल्यास नागरिकांना त्यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत. संबंधित प्लंबरमार्फत प्रत्येक घरामध्ये जाऊन त्यांच्याकडे पाणीगळती होत आहे किंवा नाही, याची पाहणी करून वहीत नोंदही केली जाणार आहे. या उपक्रमामधून दुकानगाळे, दवाखाने, मॉल यांना वगळण्यात आले आहे.
थेंब थेंब पाणी महत्त्वाचे आहे; मात्र नागरिक याकडे दुर्लक्ष करीत असल्याने लाखो लिटर पाणी वाया जाते. सेवाभावी वृत्तीने उपक्रम हाती घेतला आहे. नियुक्त केलेले दोन्ही प्लंबर यांना मी ओळखपत्र दिले आहे. ते ओळखपत्र पाहूनच त्यांना घरामध्ये प्रवेश द्यावा. - बाबूराव माने