Ganpati Festival -कोल्हापूरातील ६0 हून अधिक मंडळांमध्ये पंजे, गणेशमूर्तींची एकत्रित प्रतिष्ठापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 04:21 PM2019-09-04T16:21:22+5:302019-09-04T16:22:31+5:30
कोल्हापूर शहरातील ६0 हून अधिक तालीम संस्था व तरुण मंडळांमध्ये सलग दुसऱ्या वर्षी गणेशमूर्ती व पंजांची एकत्रित प्रतिष्ठापना केली जाणार आहे.
कोल्हापूर : शहरातील ६0 हून अधिक तालीम संस्था व तरुण मंडळांमध्ये सलग दुसऱ्या वर्षी गणेशमूर्ती व पंजांची एकत्रित प्रतिष्ठापना केली जाणार आहे.
ऐक्याची वीण जपणारे व सामाजिकतेचे झालर असलेले शहर म्हणून कोल्हापूरकडे संपूर्ण देशभरातून पाहिले जाते. त्यात यंदा गणेशोत्सव व मोहरम सण एकत्रित आला आहे. त्यानुसार शहरातील मानाचा पंजा म्हणून बाबूजमाल दर्ग्यातील नाल्या हैदर पंजाकडे पाहिले जाते. या पंजाची प्रतिष्ठापना रविवारी उशिरा रात्री झाली. त्यानंतर तिसऱ्या दिवसांपासून इतर मानाच्या पंजांची प्रतिष्ठापना केली जाते.
यात शिवाजी पेठेतील चाँदसाहेब पंजा, लक्ष्मीपुरीतील गरीबशहा पंजा, काळाईमाम तालीमचा जादुई कलम पंजा, तेली गल्लीतील शेवाळेंचा पंजा, खरी कॉर्नर येथील अवचित पीर तालीम मंडळाचा पंजा, बोडके तालमीचा राजेबागस्वार पंजा, जुना बुधवार पेठ तालीमचा झिमझिमसाहेब पंजा, शुक्रवार पेठेतील चाबुकस्वार पंजा, राजारामपुरीतील मातंग वसाहतीतील गैबी पंजा, नंगीवली तालीम मंडळचा झिमझिमसाहेब पंजा, भोई गल्लीतील मलिकाजान पंजा, शाहूपुरीतील हसन-हुसेन पंजा, असे १५० हून अधिक ठिकाणी पंजांची प्रतिष्ठापना केली जाते.
यात खंडोबा तालीम, जुना बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, दिलबहार तालीम मंडळ, पुलगल्ली, सणगर गल्ली तालीम मंडळ, आदी ६० हून अधिक ठिकाणी गणेशमूर्ती व पंजे एकत्रित प्रतिष्ठापना होणार आहे, तर काही ठिकाणी दोन्हींचीही प्रतिष्ठापना झाली आहे.
दरम्यान, शिवाजी चौकातील घुडणपीर दर्ग्यातील मानाचा अली झुल्फीकार व बेबी फातीमा पंजाची प्रतिष्ठापना गुरुवारी सायंकाळी केली जाणार आहे, तर दर्शनासाठी हा पंजा शुक्रवारपासून भक्तांकरिता खुला केला जाणार आहे.