कोल्हापुरात कोम्बिंग ऑपरेशन; ५३ जण ताब्यात, हद्दपारीतील चार गुन्हेगारांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 12:01 PM2023-07-18T12:01:49+5:302023-07-18T12:02:09+5:30
जिल्ह्यात सर्वत्र एकाचवेळी कारवाई, अधिकाऱ्यांसह फौजफाटा रस्त्यावर
कोल्हापूर : पोलिस महासंचालकांच्या आदेशानुसार राज्यात रविवारी (दि. १६) रात्रीपासून ते सोमवारी (दि. १७) पहाटेपर्यंत पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबविले. या कारवाईत जिल्ह्यातील ५३ सराईत गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागले. त्यात हद्दपारीचे उल्लंघन केलेल्या चार गुन्हेगारांचा समावेश आहे. अवैध धंद्यांवरही सामूहिक कारवाया करण्यात आल्या.
आषाढ अमावास्येच्या पार्श्वभूमीवर राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी राज्यात सर्वत्र एकाच वेळी कोम्बिंग ऑपरेशन करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यात रविवारी सायंकाळी सहा ते सोमवारी पहाटेपर्यंत ३९ ठिकाणी नाकाबंदी करून १६४१ वाहनांची तपासणी करण्यात आली. या कारवाईत ३४२ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर मोटार वाहन कायद्यानुसार नऊ वाहनचालकांवर गुन्हे दाखल केले. मद्यप्राशन करून वाहन चालवणारे पाच वाहनचालक सापडले. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना एक लाख एक हजार ४३० रुपयांचा दंड आकारण्यात आला. पोलिसांनी ५३ हॉटेल्स आणि लॉजचीही तपासणी केली.
कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान विविध गुन्ह्यात पोलिसांना हवे असलेले ५३ गुन्हेगार मिळाले. त्यात हद्दपारीचे उल्लंघन केलेल्या चार गुन्हेगारांचा समावेश आहे. जुगार आणि मटका अड्ड्यांवरही पोलिसांनी कारवाया केल्या. याप्रकरणी २१ संशयितांवर कारवाई केली, तर एक लाख ४४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कोम्बिंग ऑपरेशनमध्ये पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, निकेश खाटमोडे, उपअधीक्षक अजित टिके, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्यासह सर्व पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
या गुन्हेगारांवर झाली कारवाई
हद्दपारीचे उल्लंघन करणारे अजित अनंत नाडगौडा (रा. फुलेवाडी, तिसरा बस स्टॉप, कोल्हापूर), धीरज राजेश शर्मा (रा. पाचगाव, ता. करवीर), नासीर कलंदर बागवान (रा. कुरुंदवाड, ता. शिरोळ) आणि स्वप्निल सुनील घाडगे (रा. सुभाषनगर, कोल्हापूर) यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
फौजफाटा रस्त्यांवर
पोलिस अधीक्षक - ०१
अपर पोलिस अधीक्षक - ०२
उपअधीक्षक - ०६
निरीक्षक, सहायक निरीक्षक - ४०
पोलिस अंमलदार - १५८
होमगार्ड - ०९