शेतकरी संघटनेकडून भूमीसंपादन नोटिसांचे दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:49 AM2021-09-02T04:49:28+5:302021-09-02T04:49:28+5:30
काेल्हापूर : प्रस्तावित नागपूर-रत्नागिरी महामार्गाला तीव्र विरोध करीत शेतकरी संघटनेने बुधवारी दसरा चौकात भूमी संपादनाच्या नोटिसा दहन करण्यात आले. ...
काेल्हापूर : प्रस्तावित नागपूर-रत्नागिरी महामार्गाला तीव्र विरोध करीत शेतकरी संघटनेने बुधवारी दसरा चौकात भूमी संपादनाच्या नोटिसा दहन करण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत येथून रस्ता होऊ देणार नाही, असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला.
नागपूर - रत्नागिरी महामार्ग शिये परिसरातून जातो. त्यासाठी भूमी संपादन करण्याच्या नोटिसा संबंधित विभागाने लागू केल्या आहेत. या विरोधात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. माणिक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी बुधवारी दसरा चौकात येऊन निदर्शने केली. यावेळी बोलताना ॲड. माणिक शिंदे म्हणाले, हा राष्ट्रीय महामार्ग बेकायदेशीर प्रक्रियेद्वारे राबविला जात आहे. कोणत्याही हरकतीवर सुनावणी न घेता महामार्गाचे रेखांकन, मोजणी प्रक्रिया पार पाडली जात आहे. वास्तविक, शिये, भुये हा परिसर सुपीक पट्टा आहे, या रस्त्यांमुळे ४०० शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्याचबरोबर जलस्रोतासह राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होणार आहे. यासाठी आमचा विरोध असून, कायदा पायदळी तुडवून कोणी रस्ता करायला लागले तर अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल. आमचे संसार उद्ध्वस्त करून तुमचे संसार थाटण्याचा प्रयत्न कोणी करीत असेल तर तुडविल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी परशराम शिंदे, मानसिंग पाटील, के. बी. खुटाळे, डी. के. कोपार्डेकर, भानुदान पाटील, संग्राम पाटील, प्रतीक कुलकर्णी, अनिता जाधव, एकनाथ बुगले, अभिजित चौगले, आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : नागपूर-रत्नागिरी महामार्ग भूमिसंपादनाला विरोध करीत शेतकरी संघटनेने बुधवारी दसरा चौकात नोटिसांची होळी केली. यावेळी ॲड. माणिक शिंदे, परशराम शिंदे, मानसिंग पाटील, आदी उपस्थित होते. (फोटो-०१०९२०२१-कोल- शेतकरी संघटना) (छाया : आदित्य वेल्हाळ)