दोन तासांत दहन, रक्षाविसर्जनही..!
By admin | Published: July 18, 2016 12:59 AM2016-07-18T00:59:20+5:302016-07-18T01:10:37+5:30
गॅसदाहिनी : महापालिकेचे प्रदूषणमुक्तीचे नवे पाऊल
तानाजी पोवार / कोल्हापूर
कोल्हापूर : मृतदेहाच्या दहनानंतर होणारे प्रदूषण रोखण्यासाठी तसेच नागरिकांची होणारी कुचंबणा लक्षात घेऊन पंचगंगा स्मशानभूमी येथे सुमारे एक कोटी रुपये खर्चून मृतदेह दहन करण्यासाठी गॅसदाहिनी बसविण्यात येणार आहे. मृतदेह दहनानंतर अवघ्या दोन तासांत रक्षाविसर्जनाचा विधीही उरकता येणार आहे. दहन प्रक्रियेवेळी दुर्गंधी, धूर, वायू निर्माण होत नसल्याने हा नवा उत्तम पर्याय पुढे आला आहे. या गॅसदाहिनीसाठी १४व्या वित्त आयोगात खर्चाची तरतूद करण्यात येत आहे.
कोल्हापुरात महानगरपालिकेतर्फे तीन ठिकाणी स्मशानभूमीची सोय असून, येथे मृतदेहावर मोफत अंत्यसंस्कार केले जातात. पंचगंगा स्मशानभूमीत दहन प्रक्रियेसाठी ४२ बेड असून, प्रतिदिन किमान १० ते १२ मृतदेहांवर येथे अंत्यसंस्कार होतात. एका मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी लाकूड व शेणीचा किमान १२२० रुपये खर्च येतो. सण, अमावस्या, पौर्णिमेवेळी सलग दोन-तीन दिवस रक्षाविसर्जन विधी झाला नाही, तर नवीन मृतदेह दहनासाठी बेड शिल्लक राहत नाहीत, त्यावेळी दोन बेडच्या मध्येच दहन करण्याची वेळ येते. दहनादरम्यान दुर्गंधी, धूर व वायू प्रदूषण प्रचंड प्रमाणात होते. लाकूड व शेणी मिळण्यातही अडचणी निर्माण होतात. यातून मार्ग काढण्यासाठी गॅसदाहिनीचा प्रयोग पुढे आला आहे.
गॅसदाहिनी कमीत-कमी जागेत उभा राहू शकते. यामध्ये दहा तासांत किमान सहा मृतदेहांचे दहन करण्याची क्षमता असून ३६० किलो वजनापर्यंत मृतदेहाचे दहन करता येते. एका मृतदेहाच्या दहनासाठी किमान ७५ ते ९० मिनिटे वेळ लागतो. त्यामुळे दहन केल्यानंतर अवघ्या दोन तासांतच रक्षाविसर्जनाचा विधी पार पाडता येतो. या गॅसदाहिनीमुळे प्रदूषणावर पूर्णत: नियंत्रण मिळविता येते. सरणावरील मृतदेह दहनापेक्षा गॅसदाहिनीचा उत्तम पर्याय पुढे आला आहे.
प्रदूषण नियंत्रित
गॅसदाहिनीमध्ये मृतदेहाचे दहन केल्यानंतर त्यातून कोणतेही प्रदूषण होत नाही. कारण ही गॅसदाहिनी पूर्णत: बंदिस्त असून, मृतदेह दहनावेळी दुर्गंधी, वायू अथवा धूर निर्माण होत नाही. पारंपरिक दहन पद्धतीत एका मृतदेहापासून सुमारे ४० ते ५० किलो रक्षा निर्माण होते; पण गॅसदाहिनीमध्ये अवघी दोन किलोच रक्षा निर्माण होते. याशिवाय लाकूड आणि शेणींची बचत होते. त्यामुळे प्रदूषण नियंत्रित ठेवता येते.
दहन पद्धतीतील फरक (प्रती मृतदेह)
पारंपरिक दहन गॅसदाहिनी
दहन वेळ : ८ तास ७५ ते ९० मिनिटे
खर्च : १२२० रुपये ७०३ रुपये
रक्षा निर्माण : ४० ते ५० किलो २ किलो
रक्षाविसर्जन : किमान ३ दिवस दहनानंतर २ तासांनी
प्रदूषण : दुर्गंधी, धूर अधिक काहीच नाही
मानसिकता हवी
कोल्हापुरात स्मशानभूमीत सरणावरच दहन करण्याची प्रथा असल्याने प्रदूषणाला खतपाणी मिळते. यापूर्वी लाखो रुपये खर्चून डिझेल दाहिनीचा पर्याय महापालिकेने पंचगंगा स्मशानभूमीत उभा केला होता; पण त्यामध्ये अवघ्या दोनच मृतदेहांचे तसेच रुग्णालयातील काही सुट्या अवयवांचे व बेवारस मृतदेहांचे दहन केले होते. डिझेल दाहिनीला विरोध झाल्याने ती पूर्णपणे मोडकळीस आली, तर आता गॅसदाहिनीचा पर्याय पुढे आला आहे. त्याचा वापर करण्याची मानसिकता कोल्हापूरकरांनी स्वीकारणे गरजेचे आहे.