‘गोकुळ’मध्ये ‘साथ’ द्या, ‘केडीसीसी’ बिनविरोध करु : विरोधकांची हवा काढण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 12:57 AM2019-12-26T00:57:03+5:302019-12-26T00:57:40+5:30

गेल्या पाच वर्षांत दूध दर, मल्टिस्टेट व सर्वसाधारण सभेचे कामकाज याबाबत दूध उत्पादकांमध्ये सत्तारूढ गटाबद्दल काहिसी नाराजी आहे. त्यातून दगाफटका बसू नये; यासाठी सत्तारूढ गटाच्या नेत्यांचा राष्टÑवादीलाच आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न आहे.

Come along with 'Gokul', let 'KDCC' be free | ‘गोकुळ’मध्ये ‘साथ’ द्या, ‘केडीसीसी’ बिनविरोध करु : विरोधकांची हवा काढण्याचा प्रयत्न

‘गोकुळ’मध्ये ‘साथ’ द्या, ‘केडीसीसी’ बिनविरोध करु : विरोधकांची हवा काढण्याचा प्रयत्न

Next
ठळक मुद्दे ‘पी. एन.’, महाडिकांचा राष्टÑवादीला प्रस्ताव

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत साथ द्या, त्या बदल्यात जिल्हा मध्यवर्ती बॅँकेची (केडीसीसी) निवडणूक बिनविरोध करूया, असा प्रस्ताव सत्तारूढ गटाने राष्टÑवादीला दिला आहे. त्यातून विरोधकांची हवा काढण्याचा प्रयत्न आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा असला, तरी गेल्या पाच वर्षांत जिह्याच्या राजकारणात हसन मुश्रीफ, सतेज पाटील व संजय मंडलिक यांची जमलेली गट्टी अडसर ठरण्याची शक्यता आहे.

एरव्ही पी. एन. पाटील, महादेवराव महाडिक आणि पाच माजी अध्यक्ष एकत्र झाले की ‘गोकुळ’च्या सत्तारूढ गटाला फारशी कोणाची गरज भासत नसायची; मात्र २०१५ च्या निवडणुकीत राष्टÑवादी कॉँग्रेससोबत असताना एकट्या सतेज पाटील यांनी सत्तारूढ गटाला घाम फोडला होता. दूध संस्था प्रतिनिधींना सक्षम पर्याय मिळाल्यानंतर काय चमत्कार होऊ शकतो, हे त्या निवडणुकीने नेत्यांना दाखवून दिले; त्यामुळे सत्तारूढ गटाने यावेळेला सावध भूमिका घेतली असून, पहिल्यापासूनच तडजोडीचे राजकारण सुरू केले. मागील निवडणुकीत हसन मुश्रीफ यांनी केवळ एका जागेच्या मोबदल्यात सन २०१४ च्या निवडणुकीतील पैरा फेडण्यासाठी सत्तारूढ गटाला पाठबळ दिले होते; मात्र, गेल्या पाच वर्षांत राजकीय समीकरणे बदलली आहेत. ‘गोकुळ’ मल्टिस्टेटसह विरोधातील लढाईत मुश्रीफ, मंडलिक, सतेज पाटील, चंद्रदीप नरके एकसंध राहिले. निवडणुकीतही या नेत्यांबरोबरच आमदार विनय कोरे, माजी खासदार राजू शेट्टी, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार के. पी. पाटील, राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, संपतराव पवार यांना सोबत घेत तगडे पॅनेल बांधण्याची रणनीती सतेज पाटील यांची आहे.

गेल्या पाच वर्षांत दूध दर, मल्टिस्टेट व सर्वसाधारण सभेचे कामकाज याबाबत दूध उत्पादकांमध्ये सत्तारूढ गटाबद्दल काहिसी नाराजी आहे. त्यातून दगाफटका बसू नये; यासाठी सत्तारूढ गटाच्या नेत्यांचा राष्टÑवादीलाच आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न आहे. जिल्ह्णातील राष्टÑवादी म्हणजे हसन मुश्रीफ, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील आणि राजेश पाटील आहे. राष्टÑवादीची भूमिका मुश्रीफ हेच ठरविणार असले तरी त्यांचे मन वळवण्याची कसब ‘के. पी. -ए. वाय.’ मेहुण्या पाहुण्यांत आहे; त्यामुळे महाडिक यांनी ‘के. पी.’ तर पी. एन. पाटील यांनी ‘ए. वाय.’ यांच्या माध्यमातून तसे प्रयत्न सुरू केल्याचे समजते. राष्टÑवादीने सत्तारूढ गटाला पाठिंबा द्यायचा, त्याबदल्यात जिल्हा बॅँक बिनविरोध करून देण्याची जबाबदारी महाडिक-पी. एन. पाटील यांनी घेतली आहे. त्याचबरोबर विद्यमान संचालक मंडळात राष्टÑवादीचे राजेश पाटील व विलास कांबळे हे दोन संचालक आहेत. आणखी मुश्रीफ व ए. वाय. पाटील यांना प्रत्येकी एक जागा देऊन समझोता करण्याचा प्रयत्न आहे.

हसन मुश्रीफ यांच्या दृष्टीने जिल्हा बॅँक महत्त्वाची असली, तरी मागील पाच वर्षे ते सत्तारूढ गटात असले, तरी त्यांना महाडिक, पी. एन. पाटील यांनी महत्त्वच दिल्या नसल्याची नाराजी त्यांनी अनेकवेळा उघड व्यक्त केली आहे. त्यात ते खासदार संजय मंडलिक यांना दुखवू शकत नाहीत. संजय मंडलिक हे सतेज पाटील यांची साथ सोडू शकत नसल्याने मुश्रीफ यांच्यासमोर हा राजकीय गुंता आहे. जिल्हा बॅँकेचा प्रस्ताव जरी आला असला, तरी राष्टÑवादीसाठी अडचणीचा अधिक आहे. राष्टÑवादीबरोबरच आणखी एखादा गट आपल्यासोबत येतो का? याची चाचपणी सत्तारूढ गट करत आहे.

 

  • ‘महाविकास’ आघाडीला ‘गोकुळ’मध्ये ‘खो’
  • राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राज्यातील स्थानिक स्वराज्य व सहकारी संस्था लागू करण्याचा प्रयत्न वरिष्ठ नेतृत्वाचा असला तरी ‘गोकुळ’मध्ये त्याला ‘खो’ बसणार हे निश्चित आहे.

 

राष्टÑवादीची भूमिकाच निर्णायक
जिल्ह्यात राष्टÑवादीला मानणारे चंदगड, गडहिंग्लज, कागल, राधानगरी, भुदरगड, करवीर, पन्हाळा, शिरोळ तालुक्यांत मतदार आहेत. सुमारे ७०० ठराव राष्ट्रवादीकडे असल्याने कोणत्याही पॅनेलमध्ये त्यांचा पाच जागांचा दावा राहणार हे निश्चित आहे.

 

  • माजी अध्यक्षांना गळाला लावण्याचा प्रयत्न

‘गोकुळ’चे राजकारण हे विश्वास पाटील, अरुण डोंगळे, रवींद्र आपटे, रणजितसिंह पाटील व अरुण नरके यांच्याभोवतीच फिरते. यापैकी एक-दोन आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न विरोधकांचा आहे.

 

  • ‘गोकुळ’वरच जिल्हा बॅँकेत चुरस ठरणार

‘गोकुळ’च्या निवडणुकीत कशा आघाडी होतात, त्यावरच जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीतील चुरस ठरणार आहे. जर ‘गोकुळ’मध्ये राष्टÑवादीविरोधात राहिली तर बॅँकेच्या निवडणुकीत ‘पी. एन.- महाडिक’ हे इतरांना सोबत घेऊन निकराची झुंज देतील.


कोण कोणाबरोबर राहणार

  • सत्तारूढ गट : पी. एन. पाटील, महादेवराव महाडिक, सत्यजित पाटील, भरमूअण्णा पाटील, बजरंग देसाई,

संजय घाटगे, अरुण नरके.

  • विरोधी : सतेज पाटील, हसन मुश्रीफ, संजय मंडलिक, विनय कोरे, प्रकाश आबिटकर, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, चंद्रदीप नरके, राजेश पाटील, राजू शेट्टी, संपतराव पवार.

Web Title: Come along with 'Gokul', let 'KDCC' be free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.