‘बिद्री’साठी भाजपसोबत एकत्र येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 12:05 AM2017-08-21T00:05:51+5:302017-08-21T00:05:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कागल : बिद्री साखर कारखाना निवडणुकीसाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुरेशराव हाळवणकर यांच्याबरोबर आमच्या चर्चेच्या दोन फेºया झाल्या आहेत. भाजप आणि आम्ही तत्त्वत: एकत्र येण्याचे ठरले आहे. मात्र, या चर्चेत कागल तालुक्यातील कोणी सामील नव्हते, असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.
बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी कागल तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी येथे बोलविण्यात आला होता. त्यामध्ये कार्यकर्त्यांनी कारखाना निवडणुकीबद्दल नेमकी युती कोणाबरोबर? असे प्रश्न उपस्थितीत केले. या पार्श्वभूमीवर त्यांनी हे प्रतिपादन केले. अध्यक्षस्थानी गणपतराव फराकटे होते. यावेळी संताजी घोरपडे कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादीच्या संगीता खाडे, प्रवीणसिंह पाटील, भैया माने, दिनकर कोतेकर, सूर्यकांत पाटील, जिल्हा परिषदेच्या सदस्य मनोज फराकटे, आदी प्रमुख उपस्थित होते.
आमदार मुश्रीफ पुढे म्हणाले की, बिद्री साखर कारखान्यात के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल पंधरा हजार मतांची आघाडी घेऊन निवडून येणार यात शंका नाही. मात्र, भाजपकडून प्रस्ताव आल्याने चर्चेला सुरुवात केली आहे. शेतकºयांच्या हितासाठी कारखान्यात आम्हाला सत्ता हवी आहे. कागल तालुक्यातील उमेदवार निवडीसाठी सुकाणू समिती जाहीर केली आहे. यावेळी प्रवीणसिंह पाटील, प्रवीणसिंह भोसले, भैया माने, सुभाष चौगुले, जगदीश पुजारी, शिवाजी पाटील, रमेश पाटील, अनिल साळोखे यांची भाषणे झाली. शिवानंद माळी यांनी स्वागत केले. युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रोहित पाटील यांनी आभार मानले.
प्रवीणसिंह पाटील चिंता करू नका...
आ. मुश्रीफ म्हणाले की, ‘बिद्री’बद्दल प्रवीणसिंह पाटील चिंता करू नका. ‘जान जाये पण वचन न जाये,’ असे माझे तत्त्व आहे. ‘गोकुळ’, ‘लोकसभा’, विधान परिषद निवडणुकीत पैरा कसा फेडायचा असतो, हे आम्ही दाखवून दिले आहे. तुम्ही बिनधास्त राहा...
हसन मुश्रीफ जनतेच्या काळजातील आमदार...
आमदार सुरेश हाळवणकर यांनी काही दिवसांपूर्वी माजी आमदार संजय घाटगेंचा उल्लेख जनतेच्या मनातील आमदार असा केला होता. याचा संदर्भ घेऊन जिल्हा बँकेचे संचालक भैया माने म्हणाले की, कागलच्या जनतेने मनातला आमदार चारवेळा निवडून दिला आहे. हसन मुश्रीफ हे जनतेच्या काळजातील आमदार आहेत.