अल्पसंख्याक दर्जासाठी एकत्र या
By admin | Published: September 11, 2014 10:53 PM2014-09-11T22:53:14+5:302014-09-11T23:03:04+5:30
काका कोयटे : लिंगायत समाजाचा ‘आनंद मेळावा’ उत्साहात
कोल्हापूर : लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याची केंद्र शासनाकडे शिफारस, अकरा पोटजातींंचा इतर मागास प्रवर्गांत समावेश करण्याचा, तसेच तीन पोटजातींचा विशेष मागास प्रवर्गात समावेश करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे केंद्राबरोबरच्या पुढील लढ्यासाठी समाजबांधवांनी मतभेद विसरून एकत्र यावे, असे आवाहन लिंगायत समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष काका कोयटे यांनी केले. कोल्हापूर लिंगायत समाज संस्था व लिंगायत समाज संघर्ष समिती यांच्यावतीने आज, गुरुवारी शाहू स्मारक भवन येथे झालेल्या आनंद मेळाव्यात ते बोलत होते.
कोयटे म्हणाले, लिंगायत समाजाला ‘वीरशैव’ या नावानेही यापूर्वी ओळखले जात होते. मात्र, या समाजाला राज्य शासनाच्या आरक्षणामध्ये लाभ मिळत नव्हता. गेली वीस वर्षे ही मागणी प्रलंबित होती. याकरिता सर्व समाजबांधवांनी एकत्र येणे गरजेचे होते. म्हणून लोकसभा निवडणुकीवेळी आंदोलनाचे हत्यार उपसले. यादरम्यान आघाडी सरकारला लिंगायत समाजाची ताकद कळून आली. आझाद मैदान येथे धरणे आंदोलन केले. त्याला पाठिंबा देण्यासाठी मंत्री व आमदार यांची रांग लागली होती. त्यामुळे आपली ताकद कळल्याने आंदोलन आणखी तीव्र केले. या आंदोलनानंतर राज्य शासनाने निर्णय घेतला नाही. कऱ्हाड येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गावातच आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. याकरिता सोशल मीडियाचा वापर करीत समाजबांधवांना एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यानुसार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळानजीकच उपोषणास प्रारंभ केला. त्याला मुख्यमंत्र्यांनी प्रथम दाद दिली नाही. आंदोलन तीव्र केल्यानंतर सरकारकडून आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यात आली. मात्र, आंदोलनावर ठाम असलेल्या संघर्ष समितीने हा लढा आणखी एका दिवसाने वाढविला. दुसऱ्या दिवशी दिलीप सोपल समितीची स्थापना करण्यात आली. त्यानुसार राज्य शासनाने लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याची केंद्र शासनाकडे शिफारस, अकरा पोटजातींंचा इतर मागास प्रवर्गात समावेशाचा, तसेच तीन पोटजातींचा विशेष मागास प्रवर्गात समावेश करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अल्पसंख्याक दर्जा मिळविणे व इतर मागासवर्गामध्ये समावेश होण्यासाठी मतभेद विसरून सर्व समाजबांधवांनी एकत्र यावे. यावेळी सरलाताई पाटील यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी राज्य अध्यक्ष राजशेखर तंबाके, सुनीलशेठ रुकारी, माजी आमदार मनोहर पटवारी, विजय शेटे, ललिता पांढरे, प्रदीप वाले, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)