आरक्षणासाठी एकत्र या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 01:00 AM2019-01-14T01:00:56+5:302019-01-14T01:01:00+5:30
पट्टणकोडोली : धनगर समाजाच्या हातात एसटीचा दाखला एका महिन्याच्या आत मिळाला नाही तर हे सरकार सत्तेवर येणार नाही. त्यामुळे ...
पट्टणकोडोली : धनगर समाजाच्या हातात एसटीचा दाखला एका महिन्याच्या आत मिळाला नाही तर हे सरकार सत्तेवर येणार नाही. त्यामुळे आरक्षण न देणाऱ्या सरकारला सळो की पळो करून सोडायची वेळ आली आहे. यासाठी समाजाने एकतेची मोट बांधून लढा द्यायला हवा, असे आवाहन धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केले. पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील धनगर आरक्षण परिषदेत ते बोलत होते.
धनगर समाजाच्या लोकसंख्येच्या आधारावरच आरक्षण मिळायला हवे, ‘जिसकी जितनी संख्या भारी, उसमे उसकी उतनी बारी’ असा नारा त्यांनी दिला. पाडळकर म्हणाले, धनगर समाजाच्या मतामुळेच भाजप सरकार सत्तेवर आले आहे. मात्र, सरकारने धनगर आरक्षणाच्या बाबतीत एकही कागद या टेबलावरून त्या टेबलावर सरकवलेला नाही. सरकारने केवळ समाजाची फसवणूक केली आहे. त्यामुळे भाजप सरकारला भीक न घालता धनगराच्या पोराच्या हातात एसटीचा दाखला मिळत नाही तोपर्यंत हा सरकारविरोधी लढा चालूच राहील. ही लढाई कोल्हापुरातून सुरू झाली आहे. आरक्षण मिळेपर्यंत सरकारच्या छाताडावर बसून लढा सुरूच राहील.
आरक्षण परिषदेत उत्तमराव जानकर म्हणाले, आरक्षणाचा प्रश्न ७० वर्षांपासून तसाच राहिला आहे. त्यामुळे आता नेतृत्वाची स्पर्धा न करता एकीच्या बळाने ही समाजक्रांतीची लढाई अशीच चालू ठेवून धनगर आरक्षणाचा लढा जिंकायचा आहे. आता आम्हाला धनगर आरक्षण मिळाले नाही तर ‘अब की बार मोदी फरार’ असे जानकर यांनी सरकारला ठणकावून सांगितले.
यावेळी संदीप कारंडे, उपसरपंच धुळा डावरे, सिद्राम भाणसे, लक्ष्मण पुजारी, राणोजी पुजारी, नारायण मोठे, बाबूराव हजारे, नागेश पुजारी, राजू दलवाई, तात्यासो हराळे, कृष्णात शेळके, स्वप्निल नांगरे, अभिजित कोळेकर आदींसह समाजबांधव उपस्थित होते.
फूट पाडण्यासाठी टोळी कार्यरत
आरक्षण लढ्यात फूट पाडण्यासाठी एक मोठी टोळी कार्यरत आहे. मात्र, त्याला समाजच प्रत्युत्तर देईल. तसेच प्रत्येक मेंडक्याने कापलेल्या बोकडाचे कातडे जरी दिले तरी हे आंदोलन मोठं होईल हे सांगत, स्वार्थ ठेवून आंदोलनाला मदत करणाºयांना पडळकर यांनी टोला लगाविला.