कोल्हापुरात नाना-नानी पार्कमध्ये हास्य दिन
By Admin | Published: May 7, 2017 06:45 PM2017-05-07T18:45:38+5:302017-05-07T18:45:38+5:30
आरोग्य सदृढसाठी सतत हसत रहा
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. 0७ : हसण्याने शरीराच्या विविध व्याधी कमी होतात, मानसिक संतुलन स्थिर राहते यासाठी कायम हसत रहा, असा आरोग्याचा मूलमंत्र देत कोल्हापुरात जागतिक हास्य दिन रविवारी सकाळी साजरा करण्यात आला.
दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येणाऱ्या रविवारी जागतिक हास्य दिन येतो. यानिमित्त ताराबाई पार्क येथील नाना-नानी पार्क येथे शहरातील १५ हून अधिक हास्य क्लब ‘राजर्षी शाहू छत्रपती हास्ययोग परिवार’ या छताखाली एकत्र आले होते. हसण्यामुळे दिवस कसा आनंदी जातो, आरोग्य कसे सुदृढ राहते, हास्याचे प्रकार याची माहिती अध्यक्ष डॉ. दिलीप शहा यांनी यावेळी देत हास्याची विविध प्रात्यक्षिके सादर केली.
सन १९९५ ला मुंबईत डॉ. मदन कटारिया यांनी मुंबई येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथे भारतातील पहिला हास्य क्लब सुरू केला. त्यानंतर कोल्हापुरात टेंबलाईवाडी येथे २० जानेवारी १९९८ ला प्रथम हास्य क्लब सुरू झाला. गेली १९ वर्षे कोल्हापुरात विविध ठिकाणी हास्य क्लब आहेत. जागतिक हास्य दिनानिमित्त शहरातील विविध हास्य क्लब यांनी रविवारी एकत्रित येऊन ताराबाई पार्कातील नाना-नानी पार्क येथे हास्य दिन साजरा केला.
यावेळी डॉ. दिलीप शहा म्हणाले, हसण्यामुळे कोणतेही आजार उद्भवत नाहीत. शरीरातील रक्तवाहिन्यांमधून रक्तपुरवठा व्यवस्थित होतो,जे डायबेटिसच्या गोळ्या घेत होते, हसणे या प्रात्यक्षिकामुळे त्यांचा डायबेटिसचा आजार गायब झाला.
रक्तदाब, दमा कमी, डोकेदुखी कमी होणे, सर्दी जाणे, आवाजात बदल होणे, घोरणे बंद होणे, फुफ्फुसाचे आजार कमी होणे, पोटाचे विविध विकार नाहीसे होणे, चेहरा टवटवीत होणे, शांत झोपणे, रोगप्रतिकार शक्ती वाढणे, स्टॅमिना वाढणे असे फायदे होतात. त्यामुळे दिवस आनंदी जातो. त्याचबरोबर भांगडा, मोबाईल, कौतुक, मंत्री, लवंगी, मर्द मराठा, पैलवान , लेझिम हास्य असे ७० हास्यांचे विविध प्रकार असल्याचे डॉ. दिलीप शहा यांनी सांगितले. यावेळी प्रतापसिंह नाईक, बी. डी. गुजर, एन. एन. पाटील-सांगवडेकर, प्रफुल्ल महाजन, श्रीपाद म्हसवेकर, स्नेहल नाडकर्णी, शैलजा पाटील, सविता पाटील यांच्यासह सुमारे दोनशे ते अडीचशे हास्य क्लबचे सभासद उपस्थित होते.
आम्ही रोज नाना-नानी पार्क उद्यानात येतो. पहिले एक तास योगासने आणि त्यानंतर हास्याची प्रात्यक्षिके करतो. उद्यानातील कार्बन डायआॅक्साईड आपल्याला मिळतो. कार्बन डायआॅक्साईड आरोग्य उत्तम राहते.
- डॉ. दिलीप शहा,
अध्यक्ष,‘राजर्षी शाहू छत्रपती हास्य योग परिवार, कोल्हापूर.