दुर्लक्षामुळे फुलण्याआधीच कोमेजले ऑक्सिजन पार्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:44 PM2020-12-23T16:44:06+5:302020-12-23T16:46:15+5:30
Agriculture Sector firenews kolhapur- निधीची कमतरता आणि सामाजिक वनीकरणच्या दुर्लक्षामुळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले शेंंडा पार्कातील ऑक्सिजन पार्क फुलण्याआधीच कोमेजून गेले. जळालेल्या ६० टक्केपैकी ८० टक्के वृक्ष हे थोडीशी देखभाल केली, तर जगण्याची आशा आहे. पण याचा खर्च करायचा कुणी, हाच कळीचा प्रश्न आहे. शासनाकडून संरक्षणाचा खर्च येत नसल्यानेच गेल्या आठ महिन्यांपासून या वृक्षसंपदेकडे सामाजिक वनीकरणने दुर्लक्ष केले, त्याची परिणती संपदा जळून खाक होण्यात झाली.
कोल्हापूर : निधीची कमतरता आणि सामाजिक वनीकरणच्या दुर्लक्षामुळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले शेंंडा पार्कातील ऑक्सिजन पार्क फुलण्याआधीच कोमेजून गेले. जळालेल्या ६० टक्केपैकी ८० टक्के वृक्ष हे थोडीशी देखभाल केली, तर जगण्याची आशा आहे. पण याचा खर्च करायचा कुणी, हाच कळीचा प्रश्न आहे. शासनाकडून संरक्षणाचा खर्च येत नसल्यानेच गेल्या आठ महिन्यांपासून या वृक्षसंपदेकडे सामाजिक वनीकरणने दुर्लक्ष केले, त्याची परिणती संपदा जळून खाक होण्यात झाली.
राज्य शासनाने २०१८ मध्ये ३३ कोटी वृक्ष लागवडीची योजना आणली होती. त्याअंतर्गत कोल्हापूरला दोन लाखाचे उद्दिष्ट होते. यातील ४० हजार वृक्षलागवड शेंडा पार्कात करण्याचा पर्याय पुढे आला. कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठ सोडले, तर कुठेही एक हजाराहून अधिक झाडे एकत्र असणारे जंगल नाही.
आर. के. नगरकडे जाणाऱ्या शेंडा पार्कच्या या उघड्या माळावर सदाहरित जंगल तयार करण्याच्या आणि औषधी पारंपरिक वृक्ष लागवडीच्या माध्यमातून ऑक्सिजन पार्क तयार करण्याच्या हेतूने हा वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला. ही जागा कृषी महाविद्यालयाच्या मालकीची असल्याने तीन वर्षांनंतर वृक्षांसह हस्तांतरण करण्याच्या करारावर सह्या करुन सामाजिक वनीकरणने ९० एकर जागेवर ४० हजार रोपांची लागवड केली.
तीन वर्षांच्या करारात या झाडांच्या लागवडीपासून ते त्यांच्या देखभालीपर्यंतची सर्व जबाबदारी सामाजिक वनीकरणने घेतली. यासाठी त्यांना प्रति झाड ४४६ रुपयेप्रमाणे १ कोटी ७८ लाखाच्या संरक्षण खर्चाची तरतूद देखील वन विभागाकडून करण्यात आली. पहिली दोन वर्षे निधी मिळत गेल्याने लावलेल्या ४० हजारपैकी ३५ हजार झाडे जगली. त्यांच्या संरक्षणासाठी चारही बाजूने चर खोदून स्थानिक लोकांचा हस्तक्षेपही थांबवण्यात आला. तथापि यावर्षी कोरोनामुळे संरक्षणासाठीचा शासनाकडून येणारा निधी वारंवार मागणी करुन देखील आला नाही. त्यामुळे एप्रिलपासूनच यातून सामाजिक वनीकरण विभागाने अंग काढून घेतले.
गवत कापणीविषयी वारंवार सांगून देखील वनीकरणने याकडे दुर्लक्ष केले. परिणामी रविवारी एक हेक्टर क्षेत्राला आग लागून वृक्ष जळाले. तातडीने ते विझविण्यात आले. योग्य काळजी न घेतल्याने परत दुसऱ्याच दिवशी सोमवारी पुन्हा आग लागली आणि तब्बल ३० हेक्टरवरील वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
हस्तांतरणापूर्वीच घात
सामाजिक वनीकरणसोबत झालेल्या करारानुसार येत्या एक एप्रिलला ही वनसंपदा कृषी महाविद्यालयाकडे हस्तांतरित होणार होती. दोन महिने उरले असतानाच आग लागल्याने यामागे दुसरे काही षड्यंत्र आहे का? अशीही चर्चा सुरु आहे. या जागेवर जंगल होऊ नये अशी अनेकांची मानसिकता आहे, त्यातूनच हा प्रकार घडला आहे का? यावरुनही आता तपास सुरु आहे.
ही होती वृक्षसंपदा...
आंबा, वड, पिंपळ, चिंच, लिंब, फणस, आवळा, आपटा, करंज, बहावा, उंबर, कोकम, कदंब, बकुळ.
आम्ही गेली दोन वर्षे चांगल्याप्रकारे झाडे जगवली, पण शासनाकडे मागणी केलेला ३३ टक्के निधी अद्याप मिळालेला नसल्याने या वृक्षसंपदेची देखभाल कशी करायची, मजुरांचे पगार कशातून भागवायचे, हा मोठा प्रश्न आहे.
- मधुकर चंदनशिवे,
सहायक उपवनसंरक्षक, सामाजिक वनीकरण
जळालेल्या वृक्षांपैकी ८० टक्के वृक्षांची झळीमुळे पाने गळाली आहेत. त्यांचा बुंधा हिरवा आहे. पाणी व खत व्यवस्थापन केले, तर त्यांना पालवी फुटू शकते, हे मंगळवारी केलेल्या पाहणीदऱम्यान दिसले आहे. त्यासंबंधीच्या सूचना सामाजिक वनीकरणला केल्या आहेत.
- प्रा. एस. आर. शिंदे,
कृषी महाविद्यालय कोल्हापूर