कामगारांसाठी दिलासादायक निर्णय : कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योग सुरू होण्याची गती वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 10:51 AM2020-04-30T10:51:43+5:302020-04-30T11:04:30+5:30
फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून कंपन्यांमध्ये काम करण्यात येत आहे. उद्योग सुरू होण्याची दिवसागणिक वाढणारी संख्या जिल्ह्याच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यातील लॉकडाऊनमुळे बंद असलेले उद्योग सुरू होण्याची गती दिवसागणिक वाढत आहे. बुधवारी दिवसभरात ९६ उद्योग सुरू झाले असून कार्यान्वित उद्योगांची संख्या ३५७ पर्यंत पोहोचली आहे.
उद्योग सुरू करण्यासाठी एमआयडीसीच्या संकेतस्थळावर बुधवारपर्यंत एकूण १५४२ जणांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहत, शिरोली आणि गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील ३५७ कारखाने कार्यान्वित झाले आहेत. त्यामध्ये ७१७९ कामगार कार्यरत झाले आहेत. लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी अपूर्ण राहिलेली जॉब फिनिशिंग करणे, फिनिशिंग झालेल्या जॉबचे पॅकिंग करणे, यंत्रांची चाचणी घेणे, आदी स्वरूपातील कामे कंपन्यांमध्ये सुरू आहेत. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून कंपन्यांमध्ये काम करण्यात येत आहे. उद्योग सुरू होण्याची दिवसागणिक वाढणारी संख्या जिल्ह्याच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी आहे.
दरम्यान, एमआयडीसी आणि महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सहायता कक्ष (मैत्री), राज्य शासनाने संयुक्तपणे सहायता कक्ष स्थापन केला आहे. उद्योग सुरू करण्याची परवानगी घेणे, त्याबाबत प्रक्रियेबाबत काही मदत हवी असल्यास या कक्षाशी उद्योजकांनी संपर्क साधावा, असे आवाहन ‘एमआयडीसी’चे प्रादेशिक अधिकारी धनाजी इंगळे यांनी केले.
बुधवारची आकडेवारी
*परवानगीसाठीचे अर्ज : २०८
* सुरू झालेले उद्योग : ९६