वडिलांचे अंत्यसस्कार आटोपून थेट रंगमंचावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:31 AM2018-08-20T00:31:42+5:302018-08-20T00:31:53+5:30
कोल्हापूर : वडिलांवर अंत्यसंस्कार करुन थेट रंगमंचावर येवून राहूल पाटील या कलाकारांने ‘सोकाजीराव टांगमारे’ चा नाट्यप्रयोग केला. कलेप्रती त्याची ही समर्पीत वृत्ती पाहून रविवारी सायंकाळी केशवराव भोसले नाट्यगृह गहिवरले.
केशवराव भोसले नाट्यगृहात रविवारी सायंकाळी अभिनेते संजय मोहिते व राजश्री खटावकर यांचा ‘सोकाजीराव टांगमारे’ हा नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला होता. यातील कलाकार राहुल पाटील यांचे वडील काही दिवसांपासून रुग्णालयात अत्यवस्थ होते. यातील पहिल्या अंकातील ‘पोऱ्या’ व दुसºया अंकातील तृतीयपंथी ‘कोकिळा’ची भूमिका साकारणारा राहुल पाटील यांच्या वडिलांचे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास निधन झाले. सर्व कलाकारांपुढे, एकीकडे प्रयोग हाऊसफुल्ल ठरल्याने, राहुल साकारत असलेली भूमिका आता ऐन वेळी कोण साकारणार असा प्रश्न आ वासून उभा राहिला. दरम्यान, राहुलने ही बाब स्वत: जाणून दुपारी चार वाजता वडिलांचे अंत्यसंस्कार पूर्ण केले व तो थेट नाट्यगृहात आला. त्याने मागचा-पुढचा विचार न करता मेकअप रूममध्ये जाऊन ‘कोकिळा’चा गेटअप केला. दुसºया अंकातील ‘कोकिळा’ ताकदीने सादर करीत रसिकांची वाहवा मिळविली. प्रयोगानंतर राहुलच्या वडिलांच्या निधनाची माहिती रसिकांना समजली. कलाकार कला किती श्रेष्ठ समजतो व कलेवरील त्यांचे प्रेम किती नि:स्सीम असते, याचा हा गहिवरून टाकणारा अनुभव संपूर्ण नाट्यगृहाने घेतला.
गेल्या काही दिवसांपासून या नाटकाची रिहर्सल सुरू होती.रविवारी यातील कलाकार राहुल पाटील याच्या वडिलांचे निधन झाले.मात्र रसिकांसाठी राहुल वडिलांचे अंत्यसंस्कार उरकून पुन्हा रंगमंचावर आला आणि त्याने ‘कोकिळा’ ही भूमिका साकारत प्रयोग यशस्वी केला. यातून कलाकारांना खºया आयुष्यात किती आणि कोणत्या प्रसंगांना सामोरे जावे लागते, ही बाब पुन्हा एकदा समोर आली.
- संजय मोहिते, अभिनेता