सेनापती कापशीत रोडरोमिओंचा धुमाकूळ : पोलिसांकडून सोयीस्कर दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 10:05 PM2018-08-01T22:05:19+5:302018-08-01T22:08:03+5:30

सेनापती कापशी (ता. कागल) चिकोत्रा खोऱ्यातील मुख्य बाजारपेठ असणारे गाव आहे. सर्व शासकीय कार्यालये व बँकांच्या कामासाठी आजूबाजूच्या वीस ते बावीस गावांतील लोकांना दररोज कापशीला यावे लागते.

Commander Kapasheit Roadroman: Farewell to the Police | सेनापती कापशीत रोडरोमिओंचा धुमाकूळ : पोलिसांकडून सोयीस्कर दुर्लक्ष

सेनापती कापशीत रोडरोमिओंचा धुमाकूळ : पोलिसांकडून सोयीस्कर दुर्लक्ष

Next

सेनापती कापशी : सेनापती कापशी (ता. कागल) चिकोत्रा खोऱ्यातील मुख्य बाजारपेठ असणारे गाव आहे. सर्व शासकीय कार्यालये व बँकांच्या कामासाठी आजूबाजूच्या वीस ते बावीस गावांतील लोकांना दररोज कापशीला यावे लागते. या ठिकाणी दोन माध्यमिक, दोन इंग्लिश मीडियम, चार ज्युनिअर कॉलेज व एक वरिष्ठ महाविद्यालय आहे. यामुळे आसपासच्या खेड्यातील मुलींच्या शिक्षणाची चांगली सोय झाली आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात प्रवेशही झाले आहेत; पण येथील शाळा, कॉलेज, बस स्टॅन्ड परिसरात रोडरोमिओंचा सुळसुळाट असून, मुलींना शाळा, कॉलेज येथून घरी जाणे अवघड होत आहे.

मुलींच्या जाण्या-येण्याच्या वाटेवरच ही मंडळी थांबणे किंवा भरधाव वेगाने मोटारसायकलने चकरा मारताना दिसत आहेत. पोलिसांना याची वारंवार सूचना देऊनही रोडरोमिओंना कायद्याचा बडगा दाखविला नसल्याने पालक वर्गातून पोलिसांविषयी नाराजी व्यक्त होत आहे. मुलींना शाळांना पाठवायचे की, नाही असा प्रश्न पालकांना पडत आहे.

येथे हायस्कूल, कॉलेज, खासगी शाळा आहेत. सकाळी अकराच्या दरम्यान कॉलेज सुटतात. रोडरोमिओंच्या दहा वाजल्यापासून कॉलेजच्या आवारातून चकरा सुरू असतात. मोटारसायकलवर तीन-चारजण बसून हॉर्नचा कर्णकर्कश आवाज करीत कॉलेज परिसरात इकडून तिकडे भरधाव वेगाने गाडी मारताना सर्रास दिसतात. त्यानंतर कॉलेज सुटले की बसस्थानक परिसरात फिरणे असे प्रकार चालू असतात. संताजीनगर येथे बसण्यासाठी स्टॅन्ड नसल्यामुळे व या रोडरोमिओंच्या त्रासामुळे मुलींना बस येईपर्यंत येथील कुठल्यातरी दुकानांचा आश्रय घ्यावा लागत आहे. दररोजच्या त्रासामुळे मुलींनाकॉलेजला येणे मुश्कील होत आहे.

शाळा, कॉलेजने ठोस पावले उचलावी
शाळेकडूनही रोडरोमिओंचा शाळा परिसरात चाललेला सुळसुळाट माहीत असूनही त्यांच्या विरोधात कोण पुढे होऊन तक्रार देणार या भूमिकेमुळे तेथेही ह्या मंडळींचे राज्य चालत आहे. पण, ह्या सगळ्यांमध्ये मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न राहून जातो. यासाठी सातत्याने पोलिसांनी शाळा व बसस्थानक परिसरात थांबून रोडरोमिओंवर कारवाई करावी, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.

सडकसख्याहरींना लगाम घालणार का?

धामोड : राधानगरी तालुक्याचा पश्चिम भाग हा अत्यंत दुर्गम वाड्या-वस्त्यांनी वेढलेला आहे. यापैकी काही वाड्या-वस्त्यांवर शासनाच्या कोणत्याच योजना अजून म्हणाव्या तशा पोहोचलेल्या नाहीत किंबहुना या वाड्या-वस्त्यांवरील लोकांना उदरनिर्वाहाच्या वस्तूंची देवाण-घेवाण करण्यासाठी पाच ते दहा किलोमीटर पायी चालत यावे लागते आहे. त्यातच मुलींच्या शिक्षणाबाबत पालकांची मानसिकता नसताना; स्वत: मुलीच पुढाकार घेऊन, पायी चालत येऊन शिक्षण घेत आहेत; पण त्यांना आडवाटेवरून ये-जा करताना सडक‘सख्याहरीं’चा त्रास त्या निमूटपणे सहन करीत आपले शिक्षण घेत आहेत.
धामोडमध्ये घडलेला प्रकार हा त्याचेच द्योतक. या अशा ‘सडकसख्याहरीं’ना कोणाचीच भीती उरलेली नाही. किमान पोलीस प्रशासन तरी अशा ‘सडकसख्याहरीं’ना लगाम घालणार का? असा सवाल पालकवर्गातून विचारला जात आहे.
संपूर्ण तुळशी-धामणी परिसरातील मुलींना दहावीनंतर अकरावीमध्ये प्रवेश घ्यावयाचा असेल तर एकतर धामोड येथील सह्याद्री हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज किंवा भोगावती अगर तारळेसारख्या कॉलेजची निवड करावी लागते.
आता ही कॉलेज व गाव यातील अंतर विचारात घेता धामोड हे सोयीचे ठिकाण; पण येथे येण्यासाठीसुद्धा हणबरवाडी, मालपवाडी, आपटाळ, कुदळवाडी, केळोशी, खामकरवाडी, पिलावरेवाडी, पिंपरेचीवाडी या गावांतील मुलींना रोज पाच ते दहा किलोमीटर अंतर पायी तुडवतच यावे लागते आहे. यापैकी एकाही मार्गावर एस.टी.ची सुविधा आजअखेर झालेली नाही. त्यामुळे इथला पालकवर्ग मुलींच्या शिक्षणाबाबत पुढे येत नाही. त्यात निर्ढावलेल्या सडकसख्याहरींना या भागात प्रमाण वाढून त्यांना अक्षरश: ऊत आला आहे. परिसरातील दहावीपर्यंतच्या शाळा, त्या शाळेत मुलींच्या पास होण्याचे प्रमाण व पास विद्यार्थिनींचे अकरावीच्या वर्गात प्रवेश घेण्याचे प्रमाण बघता आकडेवारीत निश्चितच फरक दिसतो व याला कारण एकच म्हणजे ‘सडकसख्याहरीं’चा होणारा त्रास व दुसरे म्हणजे एस.टी. फेºया कमी असण्याचा परिणाम आहे.
वरवर पाहता राधानगरी तालुक्याच्या या पश्चिम भागात अनेक अवैध व्यवसायांनी डोके वर काढल्यानेच तरुण याकडे वळला आहे व त्यातूनच त्यांच्याकडून हे असे प्रकार घडत आहे. दिवसाढवळ्या व राजरोसपणे अवैध धंदे चालत असताना पोलीस प्रशासनाला याची दखल का नाही? हा विषय अनभिज्ञच आहे.

पालकवर्गात भीती
पालकवर्गात मुलींच्या शिक्षणाबाबत कमालीची भीती निर्माण झाली आहे. हे मदमस्त व्यसनी तरुण मुलींना वाटेत अडवून त्यांना दमदाटी करतात. याही अगोदर असे मुलींना अडवाअडवीचे व त्यावरून हाणामारी झाल्याचे प्रकार भागात घडले आहेत. त्यामुळे आता या भागातील पालकांनी मुलींना शाळेला पाठविण्याचे प्रमाण कमी केले आहे व कॉलेजमध्ये विद्यार्थिनींचे प्रमाण कमी झाल्याचे कॉलेज प्रशासनाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Commander Kapasheit Roadroman: Farewell to the Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.