बाजार समितीसाठी आजपासून तोफा धडाडणार

By admin | Published: June 25, 2015 01:14 AM2015-06-25T01:14:30+5:302015-06-25T01:14:30+5:30

१२ जुलैला मतदान : १९ जागांसाठी १०८ उमेदवार रिंगणात

To commence a gun from today for the market committee | बाजार समितीसाठी आजपासून तोफा धडाडणार

बाजार समितीसाठी आजपासून तोफा धडाडणार

Next

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज, गुरुवारपासून प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत. कॉँग्रेस, राष्ट्रवादी-जनसुराज्य व शिवसेना-भाजप असा तिरंगी सामना होत असून, तिन्ही पॅनेलच्या प्रचाराचा प्रारंभ येत्या चार दिवसांत होत असल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत.
बाजार समितीच्या १९ जागांसाठी १०८ जण रिंगणात आहेत. माघार व मतदान यांमध्ये तब्बल एक महिन्याचा कालावधी असल्याने पॅनेलची घोषणा होऊन बारा दिवस झाले तरी अजून प्रचाराचे नारळ फुटलेले नाहीत. प्रचाराला प्रदीर्घ कालावधी असल्याने उमेदवारांनी प्रचारासाठी अजून गती घेतली नसली तरी व्यक्तिगत गाठीभेटी सुरू आहेत. कॉँग्रेसच्या पॅनेलचा प्रचार प्रारंभ आज अमृत मल्टीपर्पज हॉल येथून होत आहे. राष्ट्रवादी-जनसुराज्य-सतेज पाटील गटाच्या पॅनेलचा प्रचार उद्या, शुक्रवारी कागल येथून, तर शिवसेना-भाजप-स्वाभिमानी शेतकरी संघटना पॅनेलचा प्रारंभ रविवारी (दि. २८) अमृतसिद्धी कळंबा येथून केला जाणार आहे.
बाजार समितीवर गेली दहा वर्षे राष्ट्रवादी कॉँग्रेस-जनसुराज्य पक्षाची सत्ता होती. संचालक मंडळाच्या चुकीच्या कारभारामुळे दोन वर्षांपूर्वी समितीचे संचालक मंडळ बरखास्त झाले. या पार्श्वभूमीवर समितीची निवडणूक होत आहे. राष्ट्रवादी आघाडी पारदर्शक कारभाराचे उद्दिष्ट घेऊन रिंगणात उतरली आहे. राष्ट्रवादीचे नेते पारदर्शक कारभाराच्या आणाभाका घेऊन मतदारांना विश्वास देण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरीही संचालक मंडळाच्या बरखास्तीचा डाग धुऊन काढताना त्यांची दमछाक उडणार, हे नक्की आहे. शिवसेना नेत्यांनी बाजार समितीमधील भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवून कारवाई करण्यास पणन संचालकांना भाग पाडले होते. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात ते माजी संचालकांचा कारभार व त्यांना पाठीशी घालणाऱ्या राष्ट्रवादी-जनसुराज्य पक्षांच्या नेत्यांवर जोरदार टीकास्त्र सोडणार, हे नक्की आहे. कॉँग्रेसही प्रचारात भ्रष्टाचाराचा मुद्दा पुढे करते की, इतर संस्थांमधील सोयीच्या राजकारणासाठी थोडी नरमाईची भूमिका घेते, याकडे पाहावे लागणार आहे.
बाजार समितीसाठी विकास संस्था, ग्रामपंचायत सदस्यांचे मतदान आहे. या संस्थांवर कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसची पकड असली तरी समितीमधील भ्रष्टाचाराबद्दल सामान्य माणसांत कमालीची चीड आहे. (प्रतिनिधी)
 

Web Title: To commence a gun from today for the market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.