कर्नाटकात दहावी परीक्षेला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:18 AM2021-07-20T04:18:49+5:302021-07-20T04:18:49+5:30
निपाणी : कोरोनामुळे लांबणीवर पडलेली दहावीची परीक्षा कर्नाटकात आजपासून सुरू झाली. सहा विषयांचे फक्त दोनच पेपर विद्यार्थ्यांना द्यावे लागणार ...
निपाणी : कोरोनामुळे लांबणीवर पडलेली दहावीची परीक्षा कर्नाटकात आजपासून सुरू झाली. सहा विषयांचे फक्त दोनच पेपर विद्यार्थ्यांना द्यावे लागणार असून, सहा विषयांच्या दोन प्रश्नपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यात ४५ हजार ४९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.
जिल्ह्यात २०७ सरकारी, १४८ अनुदानित, २०२ विनाअनुदानित अशा एकूण ५५७ माध्यमिक शाळा आहेत. या सर्व शाळांमधून ३० हजार १५६ मुले तर, १४ हजार हजार ८९३ मुली परीक्षा देणार आहेत.
कोरोनाची भीती लक्षात घेता प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक आशा कार्यकर्ता, अंगणवाडी सेविका, स्काऊट गाईड मास्टर, गाईड कॅप्टन, पी. इ. शिक्षक, मोबाईल स्वीकृती अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात सोडताना थर्मल स्कॅनिंगद्वारे विद्यार्थ्यांची तपासणी करून सॅनिटायझर देण्यात आले.
कोरोनामुळे लांबणीवर पडत असलेली परीक्षा घेण्याबाबत शासनाकडून वारंवार वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत होत्या. आज सोमवार १९ जुलैपासून परीक्षेला प्रारंभ झाला. दहावीला सहा विषय असले तरी या सहा विषयांच्या २ प्रश्नपत्रिका बनविण्यात आल्या आहेत. यामुळे २ दिवसांत परीक्षा संपणार असून सर्व पेपर ओएमआरद्वारे घेतले जात आहेत.
*लक्षणे असलेल्या विद्यार्थाना वेगळी खोली
परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लक्षणे असतील तर त्यांना स्वतंत्र खोलीत परीक्षा देण्याची सोय करण्यात आली होती.
फोटो : निपाणी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना थर्मल स्कॅनिंग मशीनने तपासणी करून परीक्षा केंद्रावर सोडण्यात आले.
२. निपाणी : कोरोनाची भीती लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात येत होते.