वाणिज्य : फिटस निदान, उपचार व शस्त्रक्रिया शिबिर शनिवारी ॲस्टर आधारमध्ये सोय : बेंगलुरूच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:30 AM2021-02-25T04:30:48+5:302021-02-25T04:30:48+5:30
कोल्हापूर : अपस्मार निदान व उपचार कोल्हापुरातच शक्य व्हावे म्हणून ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये बेंगलुरुचे प्रसिद्ध मेंदूरोग सर्जन डॉ ...
कोल्हापूर : अपस्मार निदान व उपचार कोल्हापुरातच शक्य व्हावे म्हणून ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये बेंगलुरुचे प्रसिद्ध मेंदूरोग सर्जन डॉ रवी वर्मा, अपस्मार तज्ज्ञ डॉ. रविश केणी व डॉ. मन्सूरअली सीताबखान यांचे एकत्रित पथक प्रत्येक महिन्यात एकदा अपस्मार रुग्णांची तपासणी व उपचार करणार आहे. हे पथक येत्या शनिवारी (दि.२७) येथे येणार आहे.
ॲस्टर आधारचे कार्यकारी अधिकारी आनंद मोटे म्हणाले, "व्हिडीओ ई. ई.जी नावाची चाचणी अपस्मार निदानासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते, या चाचणीमध्ये येणारी फिट ही नक्की अपस्मारच आहे का हे ठरवणे शक्य होते, ह्या चाचणीसाठी योग्य तंत्रज्ञानाबरोबरच अचूक निदानासाठी तज्ज्ञ मेंदूतज्ज्ञ असणे अत्यावश्यक असते. ॲस्टर हॉस्पिटल बेंगलुरुचे डॉ. रविश केणी यांना आतापर्यंत एक हजारहून जास्त व्हिडिओ ई. ई.जी करण्याचा अनुभव आहे ज्यामुळे रोगाचे निदान होणे शक्य होते.
डॉ. रवी वर्मा म्हणाले, ‘अपस्मार शस्त्रक्रिया दोन पद्धतीच्या असतात. क्युरेटिव्ह शस्त्रक्रियेमध्ये मेंदूचा जो छोटा भाग असपस्मारासाठी जबाबदार असतो, तो काढला जातो आणि त्यानंतर रुग्ण अपस्मारापासून मुक्त होऊ शकतो. जिथे अपस्मारासाठी मेंदूचा मोठ्या प्रमाणात भाग जबाबदार असतो अशावेळी शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट झटके येण्याचे प्रमाण कमी व्हावे हे असते याला पॅलिएटिव्ह शस्त्रक्रिया म्हटले जाते. यामुळे रुग्णाचे आयुष्य सुखकर होण्यास मदत होते.’
दहापैकी एकास येते फिट..
अपस्मार (एपिलेप्सी, फिट्स, मिरगी किंवा झटके) हा अत्यंत महत्त्वाचा मेंदूचा आजार आहे. जगात या क्षणी जवळपास ६.५ कोटी अपस्माराने पीडित रुग्ण आहेत. साधारणात: दहापैकी एकाला जीवनभरात कधी ना कधी तरी एक फिट येते.
अचानक झटका..
या आजारात मेंदूच्या एका भागातून किंवा पूर्ण मेंदूमध्ये अचानक प्रचंड विद्युत लहरी निर्माण होतात, रुग्णाला कोणतीही पूर्वकल्पना न मिळता अचानक झटका येतो. बऱ्याचदा शुद्ध हरपते. खाली पडल्यामुळे शारीरिक इजा होते. ज्याचा परिणाम शरीरावर दिसून येतो. जेव्हा दोनपेक्षा जास्त फिट्सचे अॅटॅक काही कारण नसताना येतात तेव्हा त्याला अपस्मार जडला असे सांगितले जाते.