(वाणिज्य) ‘अथायु’मध्ये छिद्राद्वारे हृदयाची मोठी शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:25 AM2021-02-24T04:25:06+5:302021-02-24T04:25:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : उजळाईवाडी येथील अथायु मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोठी चिरफाड न करता (एमआयसीएस) कमीत कमी छिद्राद्वारे हृदयाची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : उजळाईवाडी येथील अथायु मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोठी चिरफाड न करता (एमआयसीएस) कमीत कमी छिद्राद्वारे हृदयाची शस्त्रक्रिया यशस्वी केल्याची माहिती हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ज्ञ डाॅ. अमोल भोजे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. बायपास शस्त्रक्रियेला हे तंत्रज्ञान पर्याय असून मुंबई, पुण्यानंतर कोल्हापुरात ‘अथायु’मध्ये शस्त्रक्रिया होत असल्याचे त्यांनी सांगितले.
हृदयाच्या ब्लाॅकेजीससाठी स्टेंटपेक्षा बायपास शस्त्रक्रिया ही कधीही फायदेशीर व दीर्घकाळ टिकणारी आहे. स्टेंटमुळे काही काळाने पुन्हा त्रास होतो, यासाठी एन्जिओप्लास्टी व शस्त्रक्रियेचा एकत्रित लाभ रुग्णांना मिळण्यासाठी ‘एमआयसीएस’ही प्रणाली प्रभावी ठरत आहे. बायपास शस्त्रक्रियेत मोठी चिरफाड करावी लागते, त्यातून रुग्ण पूर्ववत होण्यास काही महिन्यांचा कालावधी जातो. यासाठी ‘एमआयसीएस’ हे आधुनिक तंत्रज्ञान पुढे आले आहे. देशात मोजक्याच शहरात हे तंत्रज्ञान उपलब्ध असून पश्चिम महाराष्ट्रात ‘अथायु’मध्ये याचा वापर करून तीन रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्याचे डॉ. भोजे यांनी सांगितले. कमीत कमी टाक्यात बायपास, व्होल बंद, व्हॉल बदलण्याची शस्त्रक्रिया करता येते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही प्रणाली अधिक सुरक्षित आहे. आतापर्यंत दिल्ली येथे ७०-८० रुग्णांवर अशा प्रकारची शस्त्रक्रिया केली आहे. अतिशय सुरक्षित व तीन दिवसात रुग्ण ठणठणीत होऊन घरी जातो, असेही डॉ. भोजे यांनी सांगितले.
यावेळी ‘अथायु’चे चेअरमन अनंत सरनाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सौरव गांधी आदी उपस्थित होते.