वाणिज्य-सुधारित : कॅन्सरतज्ज्ञ डॉ. सुरज पवार यांचा नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:17 AM2021-01-10T04:17:25+5:302021-01-10T04:17:25+5:30
कोल्हापूर : येथील कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे डॉ. सुरज पवार यांचा ‘हिलिंग हॅन्ड्स इन कॅन्सर’ या पुरस्काराने केंद्रीय मंत्री नितीन ...
कोल्हापूर : येथील कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे डॉ. सुरज पवार यांचा ‘हिलिंग हॅन्ड्स इन कॅन्सर’ या पुरस्काराने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. नागपूरमध्ये २ जानेवारीला ‘इन्स्पायर ॲवॉर्डस् शो’ नावाने हा कार्यक्रम झाला. डाॅ. पवार यांच्या वैद्यकीय, सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊनच त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. कॅन्सरवरील उपचारांमध्ये डॉ. पवार यांच्या कार्याची नोंद देश आणि जागतिक पातळीवर घेतली गेली आहे.
डॉ. पवार हे अवनी, सांजवात, एकटी यासारख्या सामाजिक प्रकल्पांशी जोडलेले असून, त्यातून गोरगरीब, गरजू रुग्णांची सेवा ते करतात. त्यांच्या या कार्यकतृत्वाची नोंद घेऊनच मंत्री गडकरी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. पवार यांनी अन्ननलिकेच्या कॅन्सरची अवघड शस्त्रक्रिया सोपी करून जगात भारताचा नावलौकीक वाढवला. अमेरिकेनेही या वैद्यकीय संशोधनाची दखल घेत ‘द पवार टेक्निक’ या नावाने पाठपुस्तकात समावेश केला आहे. कॅन्सर सर्जन झाल्यानंतर परदेशात राहण्याऐवजी डॉ. पवार भारतात परतले. कोल्हापुरात संपूर्ण कॅन्सरचे उपचार एकाच छताखाली आणले. यामुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, कर्नाटक या भागातील रुग्णांचे पुण्या-मुंबईचे हेलपाटे वाचले. आजपर्यंत डाॅ. पवार यांनी रुग्णालयामध्ये १० हजार शस्त्रक्रिया करतानाच ५० हजार रुग्णांना केमोथेरपी तंत्राद्वारे बरे केले आहे. यातील ८० टक्के उपचार हे जनआरोग्य योजनेखाली मोफत केले आहेत.
फोटो: ०९०१२०२१-कोल-डॉ. सुरज पवार न्यूज
कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे डॉ. सुरज पवार यांचा ‘हिलिंग हॅन्ड्स इन कॅन्सर’ या पुरस्काराने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूरमध्ये गौरव करण्यात आला.