वाणिज्य वृत्त : वारणा बँकेची २६ ला ऑनलाइन सर्वसाधारण सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:23 AM2021-03-18T04:23:21+5:302021-03-18T04:23:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील अग्रणी बँक म्हणून सभासदांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या वारणा सहकारी बँकेची यंदाची वार्षिक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील अग्रणी बँक म्हणून सभासदांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या वारणा सहकारी बँकेची यंदाची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खुल्या सभांवर निर्बंध आल्याने शुक्रवारी (दि.२६) ही सभा घेतली जात असल्याचे बँकेचे अध्यक्ष निपुण कोरे यांनी सांगितले.
सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे १९६६ मध्ये स्थापन केलेल्या वारणा बँकेचा आता वटवृक्ष झाला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, वाशी, नवी मुंबई, पनवेल, पुणेसह राज्यभर ४० शाखांसह काम करणाऱ्या या बँकेने मल्टिस्टेट होण्यासाठीचे सर्व निकष पूर्ण केले आहेत. मल्टिस्टेटचा दर्जा मिळविण्यासाठीची कार्यवाही सुरू असून, त्याची पूर्तता झाल्यानंतर लवकरच घोषणा होईल, असे कोरे यांनी सांगितले.
बँकेने ३५३५.५८ कोटी इतके वसूल भागभांडवल आहे. ९३४.८१ कोटींच्या ठेवी, तर ६११.२६ कोटींची कर्जे आहेत. बँकेचा व्यवसाय १५४६.७ कोटींचा व्यवसाय असून, ६५.३० टक्के सीडी रेषो आहे.
बँकिंगप्रणालीतील सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा ग्राहकांना बँकेमार्फत पुरविल्या जात आहेत. येथून पुढे यूपीआयच्या माध्यमातून इंटरनेट बँकिंग सुविधा पुरवण्यासाठीही बँक प्रयत्नशील असल्याचे कोरे यांनी सांगितले. या ऑनलाइन सभेत सहभागासाठी मोबाइल नंबर व ई-मेल आयडी संलग्न करण्याचे काम सुरू असून, सभेचा लॉगीन आयडी २४ व २५ रोजी सर्वांना पाठविला जाणार आहे. त्यानंतर २६ रोजी दुपारी दीड वाजता सभा होणार आहे.