फेकून दे तो चहा : ...अन् समारंभातच आयुक्त कडाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 03:53 PM2020-02-17T15:53:02+5:302020-02-17T15:56:12+5:30
पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे पदावरून महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी प्रदूषणमुक्तीबाबत मार्गदर्शन करीत होते, याचवेळी उपस्थितांना प्लास्टिक कपांतून चहा देण्याचे काम सुरू होते. हे दृश्य पाहताच आयुक्त डॉ. कलशेट्टी कडाडले. त्यांनी, ‘फेकून दे ते चहाचे कप. चहा दिला नाहीस म्हणून काही बिघडणार नाही,’ असे सांगून चहा देणाऱ्या युवकास सभागृहाबाहेर काढले.
कोल्हापूर : पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे पदावरून महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी प्रदूषणमुक्तीबाबत मार्गदर्शन करीत होते, याचवेळी उपस्थितांना प्लास्टिक कपांतून चहा देण्याचे काम सुरू होते. हे दृश्य पाहताच आयुक्त डॉ. कलशेट्टी कडाडले. त्यांनी, ‘फेकून दे ते चहाचे कप. चहा दिला नाहीस म्हणून काही बिघडणार नाही,’ असे सांगून चहा देणाऱ्या युवकास सभागृहाबाहेर काढले.
राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये रविवारी सायंकाळी एका पुरस्कार वितरण समारंभात महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी पुरस्कर प्रदान केल्यानंतर प्रदूषणासंबंधी मार्गदर्शन करण्यास प्रारंभ केला. त्याचवेळी उपस्थितांना प्लास्टिकच्या कपांतून चहा देण्यासाठी एक युवक सभागहृात आला. त्याच वेळी व्यासपीठावरूनच आयुक्त डॉ. कलशेट्टी त्याच्यावर कडाडले.
‘फेकून दे तो प्लास्टिकचा चहाचा कप. आम्ही दिवसभर प्लास्टिकविरोधी जागृती करायची अन् तुम्ही प्लास्टिकच्या कपातून चहा वाटता, हे योग्य नाही. चहा नाही दिला म्हणून काही बिघडत नाही,’ असे म्हणत त्यांनी चहावाल्याला सभागृहातून बाहेर हाकलत ‘विल्हेवाट लाव त्या कपांची,’ असा सल्ला दिला. आयुक्तांच्या या भूमिकेमुळे सभागृह काहीवेळ भांबावून गेले.
प्रबोधनातून राष्ट्र उभारले आहे. आपण स्वच्छता करणारे आहोत, घाण करणारे नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे, असे सांगून ते म्हणाले, जयंती नाल्यातून रोज आम्ही कचरा काढत आहोत, चहा द्यायचाच असेल तर कपबशीतून द्या. जिल्ह्याबरोबर भारतही प्लास्टिकमुक्त झाला पाहिजे, हे प्रत्येकाने स्वप्न बाळगावे.
आमची हद्द नसतानाही आम्ही गांधीनगरमध्ये जाऊन प्लाास्टिकबाबत कारवाई केली. आजच मंडईतही फेरफटका मारताना भाजी मंडईही प्लास्टिकमुक्त झाल्याचे लक्षात आले. भाजीवाल्या ग्रामीण महिलांत जागृती झाली, आता तुम्हीही सुधारा, असाही त्यांनी सज्जड दम दिला.
ट्रॉफीनिर्मात्यावरही कारवाई
आयुक्त डॉ. कलशेट्टी हे ज्या पुरस्कार वितरण समारंभास आले, त्या कार्यक्रमात पुरस्कार देताना ट्रॉफीला पॅकिंगसाठी प्लास्टिकचा कागद गुंडाळला होता. त्यावरही त्यांनी ताशेरे ओढले. ट्रॉफीची निर्मिती करणाऱ्यावरही कारवाई करणार असल्याचाही त्यांनी सज्जड दमच दिला.