सोळांकूर ग्रामस्थांशी आयुक्त बलकवडे यांची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:39 AM2020-12-16T04:39:15+5:302020-12-16T04:39:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : थेट पाईपलाईन योजनेतील काम नियोजित आराखड्याप्रमाणेच व्हावे आणि त्याला ग्रामस्थांचे सहकार्य मिळावे या उद्देशाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : थेट पाईपलाईन योजनेतील काम नियोजित आराखड्याप्रमाणेच व्हावे आणि त्याला ग्रामस्थांचे सहकार्य मिळावे या उद्देशाने मंगळवारी महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सोळांकूरच्या ग्रामस्थांशी चर्चा केली; परंतु मूळ आराखड्यात बदल करावेत, असे सांगत ग्रामस्थांनी आपली भूमिका आजही ठाम असल्याचे स्पष्ट केले.
कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नियोजित काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेची पाचशे मीटर अंतरातील जलवाहिनी सोळांकूर गावातून जात असून तिला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. जलवाहिनीचे काम जवळजवळ पूर्ण होत आले असून केवळ सोळांकूर येथील वादामुळे ते रखडले आहे. याबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांनी महापालिका प्रशासक बलकवडे यांना मंगळवारी जाऊन ग्रामस्थांशी चर्चा करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार बलकवडे यांनी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, जलअभियंता हर्षजित घाटगे, ठेकेदाराचे प्रतिनिधी राजेंद्र माळी यांच्यासह सोळांकूर गावास भेट देऊन तेथील सरपंच आर. वाय. पाटील व ग्रामपंचायत सदस्यांशी चर्चा केली. यावेळी राधानगरीच्या तहसीलदार मीना निंबाळकर याही उपस्थित होत्या. बलकवडे यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यावेळी त्यांनी गावातून जलवाहिनी टाकण्याऐवजी कॅनॉलजवळील डोंगरातून टाकावी अशी सूचना केली. गावातून जलवाहिनी टाकल्यास घरांचे नुकसान होणार असल्याने ग्रामस्थांचा विरोध असल्याचे यावेळी सांगण्यात आले. चर्चेनंतर बलकवडे यांनी परीट गल्ली तसेच ग्रामस्थांनी सुचविलेल्या डोंगराच्या परिसराची पाहणी केली.