आयुक्त-नगरसेवक वाद शिगेला
By admin | Published: October 25, 2016 12:23 AM2016-10-25T00:23:35+5:302016-10-25T01:13:56+5:30
आयुक्त रजेवर : निषेधार्थ सभा तहकूब; फायली भिरकावल्या; उपायुक्तांवर पुन्हा आरोप
कोल्हापूर : महानगरपालिकेची तहकूब सभा असल्याचे माहीत असूनही आयुक्त पी. शिवशंकर यांनी रजा घेत महानगरपालिकेकडे पाठ फिरविल्यामुळे नगरसेवकांनी सोमवारी सभागृह डोक्यावर घेतले. तसेच फायली, कागदपत्रे भिरकावत आयुक्तांचा निषेध केला आणि सभा तहकूब केली. सभेत उपायुक्त विजय खोराटे यांनी १६ कोटींच्या बोगस टीडीआरच्या फाईलवर सही केल्याचा गंभीर आरोप भूपाल शेटे यांनी केल्याने सभागृहात गदारोळ उठला. गुरुवारी आयुक्तांच्या वर्तनाचा निषेध करून महानगरपालिकेची सभा तहकूब केली होती, ती सोमवारी दुपारी बारा वाजता महापौर अश्विनी रामाणे यांच्या अध्यक्षतेखाली सुरूझाली. सभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी आयुक्तांच्या खुर्चीवर अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर बसले, त्यामुळे आयुक्तांची रजा असल्याची कुणकुण सभागृहाला लागली. महापौर रामाणे यांनी सभेचे कामकाज सुरूकरण्याचे आदेश देताच सर्वच सदस्य जागेवर उभे राहून आयुक्तकुठे आहेत? अशी विचारणा करूलागले. त्यावर नगरसचिव दिवाकर कारंडे यांनी ते रजेवर असून, तसा अर्ज महासभेकडे पाठविला असल्याचा खुलासा केला.
आयुक्त नसल्यामुळे विजय सूर्यवंशी, भूपाल शेटे, मेहजबीन सुभेदार, रूपाराणी निकम, जयश्री चव्हाण, पूजा नाईकनवरे, आदींनी जोरदार आक्षेप घेतला. आयुक्त नसतील तर आजच्या सभेत झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी कोण करणार, अतिरिक्त आयुक्तांना त्याचे अधिकार आहेत का? अशी विचारणा यावेळी करण्यात आली. अजित ठाणेकर यांनी सभा तहकूब ठेऊन मंगळवारी सभा घ्या, अशी मागणी केली. आयुक्त गेली दहा महिने स्थायी सभेला येत नाहीत, आता महासभेलाही आले नाहीत ते या महानगरपालिकेचे मालक आहेत का, असा सवाल जयश्री चव्हाण यांनी उपस्थित केला.
‘आयुक्त बुलाव’च्या घोषणा
सर्वच सदस्यांचा राग अनावर झाल्यानंतर त्यांनी ‘बुलाव बुलाव आयुक्त बुलाव’अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडले. आयुक्तांना फोन लावून सभेस येण्याचा आग्रह सदस्यांनी धरला. त्यावेळी महापौर रामाणे यांनी आपण सकाळी प्रयत्न केला; परंतु त्यांचा फोन लागला नाही, असा खुलासा केला. अशा घोषणाबाजीत काही सदस्य बोलत राहिले. आयुक्तांनी गेल्या एक वर्षात एक तरी चांगले काम केले का ? अशी विचारणा संतोष गायकवाड यांनी केली. आयुक्तांना काम करायचे नसेल तर त्यांनी बदली करून घ्यावी, अशी सूचना विजय खाडे यांनी केली.
सभागृहाची चेष्टा करूनका
अधिकारी नीट उत्तर देत नाहीत. आयुक्तरजेवर गेले आहेत, उपायुक्तांकडे चौकशी केली तर ते सांगतात आयुक्त येणार आहेत. सभागृहाची अधिकाऱ्यांनी चेष्टा चालविली आहे. आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांना येथे रहायचे नसेल तर खुशाल जावे, पण सभागृहाची चेष्टा करू नका, असे आवाहन प्रा. जयंत पाटील यांनी केले. सफरचंदासारखे चेहरे घेऊन अधिकारी गालातल्या गालात हसत असतील आणि सभागृहाची चेष्टा होत असेल तर सभेचे कामकाज थांबवूया, असेही त्यांनी महापौरांना सुचविले.
सत्ताधारी-विरोधक आयुक्तांच्या विरोधात
कोल्हापूर : गेल्या दहा महिन्यांत एकमेकांच्या विरोधात लढणारे महानगरपालिकेतील काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप-ताराराणी आघाडीचे नगरसेवक एकत्र येऊन आयुक्त पी. शिवशंकर यांच्या विरोधात एकवटल्याचे सोमवारी दिसून आले. आयुक्तांनी सभागृहावर, नगरसेवकांवर चुकीचे आरोप केले असल्याने त्यांच्या विरोधात लवकरच नगरविकास विभागाकडे तक्रार करण्यात येईल, अशी माहिती प्रा. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.
महापालिकेची सभा आयुक्तांचा निषेध करून तहकूब केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत प्रा. पाटील म्हणाले की, काही दिवसांतील महानगरपालिकेतील घडामोडी पाहता त्या महानगरपालिकेच्या हिताच्या दृष्टीने घातक आहेत. व्यक्तिश: मी गुरुवारच्या सभेत नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला होता; परंतु आयुक्त
पी. शिवशंकर यांनी पत्रकार परिषद घेऊन नगरसेवकांवर आरोप केले. त्यांना आव्हान दिले आहे.
सोमवारी ते महापालिकेच्या सभेत आले असते तर समोरासमोर चर्चा करता आली असती. जनतेच्या हिताच्या विरोधात भले नगरसेवकांनी काही प्रस्ताव नाकारले असतीलही; पण त्याचे भांडवल करून खोटे आरोप करणे अयोग्य आहे. ज्यावेळी काही अडचणी असतील तेव्हा आयुक्त स्थायी सभेत जाऊन सदस्यांना विनंती करतात, समजावून सांगतात; पण हे आयुक्त कधीही स्थायी समिती सभेस हजर राहिले नाहीत. कधीही त्यांनी स्थायी समितीला विश्वासात घेतले नाही आणि पाय बांधले, असे आरोप करतात हे चुकीचे आहे.
उपायुक्त विजय खोराटे यांनी नगररचना विभागाचे कामकाज पाहावे की नको याच्याशी आमचे देणे-घेणे नाही; पण ते काम पाहत असताना त्यांचा सगळा वेळ त्याच कामात जाणार असेल आणि सर्वसामान्य लोकांच्या कामांकडे दुर्लक्ष होणार असेल तर मात्र आम्हाला त्यांना विरोध करावा लागेल. त्यांनी तो कार्यभार सांभाळू नये, असे आम्हाला सांगावेच लागेल, असे पाटील म्हणाले.
यावेळी स्थायी सभापती मुरलीधर जाधव, ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम, राष्ट्रवादीचे गटनेते सुनील पाटील, शिवसेनेचे गटनेते नियाज खान उपस्थित होते; परंतु महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला गैरहजर होत्या.
आयुक्त हिटलरसारखे
आयुक्त शिवशंकर हिटलरसारखे वागत आहेत. त्यांच्यामुळे संपूर्ण शहर वेठीस धरले जात आहे. त्यामुळे आता आम्ही सर्वच पक्षांचे नगरसेवक एकत्र येऊन त्यांच्याशी लढणार आहोत. जर त्यांनी कामात सुधारणा केली नाही, तर त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणावा लागला तर त्याचाही विचार केला जाईल, असे भाजपचे गटनेते विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
बोगस टीडीआरवर सही
१६ कोटींच्या बोगस टीडीआरवर उपायुक्त विजय खोराटे यांनी सही केली आहे, यासंदर्भातील कागदपत्रे आपल्याकडे आहेत, असा आरोप भूपाल शेटे यांनी केला. ज्या मालकाच्या नावे जमीनच नाही, त्यांना हा टीडीआर देण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे मोठ्या अधिकाऱ्यांना बेड्या घालून नेल्याशिवाय माझा बोगस टीडीआरविरुद्धचा लढा थांबणार नाही, असा इशाराही शेटे यांनी दिला. केवळ दोनशे बिल्डरांसाठी उपायुक्तखोराटे यांनी दिवसातील चार ते पाच तास खर्च करणे अयोग्य आहे, म्हणूनच त्यांनी नगररचना विभागात जास्त वेळ अडकून न राहता जनतेचे प्रश्न सोडविण्यास खर्च करावेत, असे प्रा. जयंत पाटील म्हणाले.