आयुक्त कलशेट्टी बनले पर्यवेक्षक, परीक्षार्थी विद्यार्थ्यांशी साधला संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 02:15 PM2019-03-30T14:15:03+5:302019-03-30T14:16:03+5:30
कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या साधेपणाची जाणीव आता सर्वांनाच झाली आहे. यापूर्वीच्या आयुक्तांनी छोट्या-छोट्या कामांत कधी लक्ष घातले नाही. कलशेट्टी मात्र कर्तव्यभावनेतून अशा गोष्टीत लक्ष घालतात. त्याची चुणूक गुरुवारी (दि. २८) सर्वांनाच आली. शिक्षण समितीच्या वतीने घेतल्या जात असलेल्या केटीएस परीक्षेवेळी कलशेट्टी यांनी चक्क परीक्षा केंद्राला भेट दिली आणि काही काळ पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले.
कोल्हापूर : महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या साधेपणाची जाणीव आता सर्वांनाच झाली आहे. यापूर्वीच्या आयुक्तांनी छोट्या-छोट्या कामांत कधी लक्ष घातले नाही. कलशेट्टी मात्र कर्तव्यभावनेतून अशा गोष्टीत लक्ष घालतात. त्याची चुणूक गुरुवारी (दि. २८) सर्वांनाच आली. शिक्षण समितीच्या वतीने घेतल्या जात असलेल्या केटीएस परीक्षेवेळी कलशेट्टी यांनी चक्क परीक्षा केंद्राला भेट दिली आणि काही काळ पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले.
महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीमार्फत सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील महानगरपालिका प्राथमिक शाळातील इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘कोल्हापूर प्रज्ञा शोध-म.न.पा.’ हा उपक्रम राबविला जात आहे. निवड चाचणीत ९० व ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण संपादन करून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची तिसऱ्या टप्प्यातील अंतिम परीक्षा गुरुवारी श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर या केंद्रावर पार पडली. परीक्षाकाळात आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच काही वेळ पर्यवेक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधत आनंददायी पद्धतीने बौद्धिक विकास होण्याच्या दृष्टिकोनातून घेतली जाणारी ‘कोल्हापूर प्रज्ञाशोध - म.न.पा.’ (केटीएस) परीक्षा हा शिक्षण समितीचा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन कलशेट्टी यांनी केले. यावेळी उपायुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, प्रशासनाधिकारी केशव यादव, रमेश मस्कर, अरुणकुमार गवळी उपस्थित होते.
प्रशासनाधिकारी यादव यांनी ‘कोल्हापूर प्रज्ञाशोध परीक्षा’ उपक्रमाची माहिती दिली. मुलांची गुणवत्ता, पटसंख्या वाढावी, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधत आनंददायी पद्धतीने बौद्धिक विकास होणार असल्याचे यादव यांनी सांगितले. परीक्षेच्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा ट्रॉफी, मेडल व प्रशस्तीपत्र वितरणाचा भव्यदिव्य सोहळा शिक्षण समितीच्या वतीने करण्यात येणार असल्याचेही त्यांना सांगितले.
महापालिकेच्या २७ शाळांतील इयत्ता पहिलीचे २५१ तसेच दुसरीचे १५६ असे एकूण ४०७ विद्यार्थी अंतिम परीक्षेसाठी सहभागी झाले होते. सर्व सहभागी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना राजगिरा लाडूंचे वाटप करण्यात आले. केटीएस परीक्षेचे नियोजन कनिष्ठ लिपिक संजय शिंदे, अजय गोसावी, नीलेश सरनाईक, राजाराम शिंदे यांनी केले.