अखेर कोल्हापूरला आयुक्त मिळाले, के. मंजुलक्ष्मी उद्या स्वीकारणार कार्यभार

By भारत चव्हाण | Published: August 22, 2023 02:03 PM2023-08-22T14:03:17+5:302023-08-22T14:04:49+5:30

कोल्हापूर : गेल्या ऐंशी दिवसांहून अधिक काळ रिक्त असलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासकपदी अखेर के. मंजूलक्ष्मी यांची नियुक्ती ...

Commissioner of Kolhapur Municipal Corporation Appointment of K. Manjulakshmi | अखेर कोल्हापूरला आयुक्त मिळाले, के. मंजुलक्ष्मी उद्या स्वीकारणार कार्यभार

अखेर कोल्हापूरला आयुक्त मिळाले, के. मंजुलक्ष्मी उद्या स्वीकारणार कार्यभार

googlenewsNext

कोल्हापूर : गेल्या ऐंशी दिवसांहून अधिक काळ रिक्त असलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासकपदी अखेर के. मंजूलक्ष्मी यांची नियुक्ती झाली. त्या बुधवारी प्रशासकपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. येथे येण्याआधी त्यांनी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. स्वत: पुढाकार घेऊन हिरिरीने काम करण्याची पद्धत, लोकांसाठी भरपूर वेळ देण्याची सवय आणि सहकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या चांगल्या कामाची नेहमीच दखल घेणाऱ्या अधिकारी अशी त्यांची प्रतिमा आहे.

महानगरपालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची दि. २ जून २०२३ रोजी बदली झाली. त्यांच्या बदलीनंतर हे पद रिक्त होते. प्रशासक म्हणून कोणाला आणायचे, याबाबत राजकीय वाद निर्माण झाल्यामुळे बरेच दिवस नियुक्ती रखडली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दीपक केसरकर या सर्वांनी चार-आठ दिवसांत प्रशासक दिले जातील, असे सांगूनही नियुक्तीचा घोळ सुरू होता.

प्रशासकाची नियुक्त तातडीने करा, अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री यांच्यापर्यंत करण्यात आली होती. त्यासाठी कोल्हापुरात आंदाेलन झाले. आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत मागणी केली. अखेर कोल्हापूरकरांची ही प्रतीक्षा के. मंजूलक्ष्मी यांच्या नियुक्तीनंतर संपली. त्यांच्या बदलीचे आदेश झाले तेव्हा त्या मुंबईत विविध बैठकीत व्यस्त होत्या.

आयएएस २०१३ च्या बॅचच्या अधिकारी असलेल्या मंजूलक्ष्मी यांनी भारतीय प्रशासन सेवेत दाखल होताच रत्नागिरी येथे प्रांताधिकारी, नाशिक येथे उपजिल्हाधिकारी म्हणून काम केले. त्या दि. ९ फेब्रुवारी २०१८ ला सिंधुदुर्गमध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी झाल्या. त्यानंतर सिंधुदुर्गमध्येच २० मे २०२० रोजी जिल्हाधिकारी झाल्या.

मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दोन वर्षे आणि जिल्हाधिकारी म्हणून तीन वर्षे सहा महिने असे साडेपाच वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी काम केले. आजवरच्या अधिकाऱ्यांमध्ये सर्वाधिक काळ त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात राहिल्या. कोरोनाकाळात त्यांनी सर्वोत्कृष्ट काम केले. त्यांच्या काळातच सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छ भारतमध्ये देशात पहिल्या क्रमांकावर आला. त्याबद्दल त्यांचा दिल्लीत गौरवही झाला होता.

Web Title: Commissioner of Kolhapur Municipal Corporation Appointment of K. Manjulakshmi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.