आयुक्तांकडून फुले रुग्णालयाचे ‘आॅपरेशन’
By admin | Published: June 3, 2017 12:52 AM2017-06-03T00:52:56+5:302017-06-03T00:52:56+5:30
आयुक्तांकडून फुले रुग्णालयाचे ‘आॅपरेशन’
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : अपुरे डॉक्टर, भरमसाट गैरसोयी, कर्मचाऱ्यांची मनमानी, रुग्णांची होणारी हेळसांड यामुळे टीकेचे लक्ष्य बनलेल्या सावित्रीबाई फुले रुग्णालयास शुक्रवारी दुपारी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी अचानक भेट देऊन तेथील परिस्थितीचा अनुभव घेतला. स्वत: डॉक्टर असलेल्या चौधरी यांनी रुग्णालयातील अनास्था पाहून आरोग्याधिकारी, रुग्णालयाचे प्रमुख यांना चांगलेच फैलावर घेतले. तसेच रुग्णालयाच्या इमारतीच्या दुरुस्तीची झालेली ढिसाळ कामे पाहून आयुक्त भलतेच संतप्त झाले. त्यांनी संबंधित ठेकेदारावर थेट फौजदारीच दाखल करण्याचे आदेश दिले.
आपत्ती व्यवस्थापनाच्या बुधवारी (दि. ३१) झालेल्या बैठकीत महापौरांसह काही पदाधिकाऱ्यांनी सावित्रीबाई फुले रुग्णालयातील अनास्थेबाबत स्वत: जाऊन पाहणी करून माहिती घ्या, अशी आयुक्तांना विनंती केली होती. त्यानुसार आयुक्त चौधरी यांनी शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास रुग्णालयास अचानक भेट दिली. त्यानंतर त्यांनी आरोग्याधिकारी डॉ. अरुण परितेकर, वैद्यकीय अधिकारी प्रकाश पावरा, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना बोलावून घेतले. या सर्वांबरोबर त्यांनी रुग्णालयातील प्रत्येक विभागात जाऊन तेथील परिस्थितीचा अंदाज घेतला.
सर्वप्रथम त्यांना प्रसूती विभागात भेट देऊन माहिती घेतली. प्रसूती कक्षातील गैरसोयींबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. तेथील इलेक्ट्रिक वायरिंग, भिंंतींचे रंग, अस्वच्छतेबाबत कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले. रक्त व लघवीच्या तपासणी कक्षात आयुक्तांनी भेट दिली असता तेथील अस्ताव्यस्तपणा पाहून आयुक्त संतप्त झाले. त्यावेळी आयुक्तांनी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना लॅबजवळून जाणाऱ्या ड्रेनेजची दुरुस्ती करण्याची सूचना केली.
सर्जिकल वॉर्डात जाऊन आयुक्तांनी रुग्णांशी चर्चा केली. त्यांनीही तेथील गैरसोयी निदर्शनास आणून दिल्या. रक्त व लघवीच्या तपासण्या येथे होत असताना बाहेरील पॅथॉलॉजी सेंटरची पत्रे दिली जातात. अशी माहिती रुग्णांनी दिली. त्यावेळी असे कोणी करीत असेल तर त्यांची चौकशी करून संबंधित डॉक्टरांना नोटीस काढा, असे आयुक्तांनी आरोग्याधिकाऱ्यांना सांगितले.
ठेकेदारांवर फौजदारीचे आदेश
छतावरील गळती काढण्याचे काम करण्यात आल्यानंतरही गळती सुरूच आहे. स्लॅबवर कोबा करीत असताना ड्रिल मशीनने तो फोडला असल्याने एकूण स्लॅबच धोकादायक बनला आहे. ही बाब आयुक्तांच्या लक्षात येताच ते डॉ. प्रकाश पावरा तसेच ठेकेदारावर भडक ले. ‘तुम्ही तुमच्या घरची कामे अशाच प्रकारे करून घेता काय?’ अशा शब्दांत त्यांना झापले. ठेकेदारांकडून पुन्हा ही कामे करून घ्या; शिवाय त्यांच्यावर फौजदारीही करा,’ असा आदेश त्यांनी दिला.
जादा डॉक्टर नेमणार
रुग्णालयाकडे डॉक्टरांची संख्या कमी असल्यामुळे कॉँट्रॅक्ट बेसवर आणखी काही डॉक्टर्स घेण्याचा प्रयत्न राहील. रुग्णालयाच्या दुरुस्तीच्या कामात बऱ्याच त्रुटी दिसून आल्या. त्या दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, असे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
गच्चीवर दारूच्या बाटल्या!
रुग्णालयाचे छत गळत असल्याची गंभीर तक्रार समोर आल्यानंतर आयुक्त चौधरी यांनी गच्चीवर जाऊन पाहणी केली. त्या ठिकाणी अनपेक्षितपणे पाईपखाली दारूच्या बाटल्या आढळून आल्या. त्या पाहून चौधरी यांचा रागाचा पारा चढला. त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. ‘कोण हे उपद्व्याप करतो?’ अशी विचारणा केल्यावर रुग्णांचे नातेवाईक रात्रीच्या वेळी जेवणासाठी म्हणून वर जात असतात, असे उत्तर काही कर्मचाऱ्यांनी दिले.