आयुक्तांनी सभागृहाचा सन्मान राखावा

By admin | Published: October 24, 2016 12:50 AM2016-10-24T00:50:00+5:302016-10-24T00:50:00+5:30

सुनील कदम : असंसदीय भाषा थांबवा

The Commissioner should honor the House | आयुक्तांनी सभागृहाचा सन्मान राखावा

आयुक्तांनी सभागृहाचा सन्मान राखावा

Next

कोल्हापूर : महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सभागृहाचा सन्मान राखावा, असे आवाहन माजी महापौर सुनील कदम यांनी रविवारी पत्रकाद्वारे केले आहे.
पत्रकात म्हटले आहे की, बाबासाहेब कसबेकर, द. न. कणेरकर, शामराव शिंदे यांच्यासारखे लोकप्रतिनिधी तर पृथ्वीराज बायस, सुधाकर जोशी, जयरथ यांच्यासारख्या प्रशासकांनी महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे संबंध कसे असावेत, याचे एक मूर्तिमंत उदाहरण होते. असा इतिहास असणाऱ्या महापालिकेत एक प्रशासकीय अधिकारी ‘हात-पाय बांधून पळा म्हणतात,’ अशी असंसदीय भाषा जनतेतून निवडून आलेल्या ८१ नगरसेवकांच्या समोर काढत असतील तर यापूर्वी झालेल्या महागाई, घरफाळा, टोलसारख्या अन्यायाविरुद्ध एकेकाळी महाराष्ट्रात ‘एल्गार’ ठरलेली आंदोलने एखाद्या अधिकाऱ्याच्या विरोधात कोल्हापुरात पुन्हा होतील. त्यामुळे यापुढे सभागृहाच्या कामकाजात बोलताना अशाप्रकारे असंसदीय शब्द येऊ नयेत याची काळजी आयुक्तांनी घ्यावी.
वास्तविक, जनतेची कामे करण्यासाठी पदरमोड करून आम्ही व आमचे सहकारी महापालिकेत निवडून आलोय. निवडणुकीपासून आजपर्यंत प्रभागात एक दमडीचाही निधी आम्हाला मिळालेला नाही. जनतेचा रेटा असतानाही निव्वळ संपर्काच्या माध्यमातून आम्ही आमच्या प्रभागात कार्यरत आहोत तरीही, नगरसेवकांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा संशयकल्लोळ उभा करून आपण स्वच्छ प्रशासक असल्याचा ‘विश्वामित्री पवित्रा’ घेणाऱ्या आयुक्तांचा सहकारी आयुक्तांच्या हिटलरशाहीविरोधात सभागृहात अश्रू ढाळत असेल तर आपल्या अरेरावीला आपल्याजवळचे अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी किती वैतागले असतील तर याचे आत्मचिंतन आयुक्तांनीच केलेले बरे. सभागृहामध्ये नगरसेवकांनी जर शहराच्या हिताची माहिती विचारली तर त्यामध्ये आयुक्तांसारख्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी थयथयाट करायची गरज काय?, पालिकेच्या इतिहासात अधिकाऱ्यांमध्ये व कर्मचाऱ्यांमध्ये आलेली स्वेच्छानिवृत्तीची लाट आयुक्तांच्या वर्तणुकीचे एक उदाहरण म्हणावे लागेल.
तर जशास तसे उत्तर देऊ
काही प्रमाणात लोकप्रतिनिधींकडून प्रशासनाबाबतीत गैरवर्तन घडत असेल त्याचीही खबरदारी घेत आहोत; पण सर्व नगरसेवक सभागृहात विकासाबाबतीत एकच आहोत. आयुक्तांमुळे जर शहराच्या सुधारणेत विकासात्मक भर पडत असेल तर आम्ही हात-पाय बांधून पळायलासुद्धा तयार आहोत व त्यासाठी आम्हास काही गैर वाटत नाही. मात्र, यापुढे नगरसेवकांच्या विरोधात सभागृहात ‘असंसदीय भाषा’ वापरली तर राजर्षी शाहूंच्या नगरीतील हा नगरसेवक या आयुक्तांच्या उद्दामपणाला व हिटलरशाहीला ‘जशास तसे’ उत्तर देतील तसेच याचे भान यापुढे आयुक्तांनी राखून लोकप्रतिनिधींचा सन्मान करावा.

 

Web Title: The Commissioner should honor the House

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.