आयुक्तांनी उलगडला जीवनपट, अक्षरगप्पांमध्ये प्रकट मुलाखत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 07:14 PM2020-03-05T19:14:52+5:302020-03-05T19:16:46+5:30
सोलापूर जिल्ह्यातील वळसंग हे खेडेगाव. मी पाचवीत असताना वडील वारले. घरात सहा बहिणी. परिस्थिती गरिबीची. त्या काळातही मी एम.एस्सी. बी. एड्, नंतर प्राध्यापक म्हणून नोकरी धरली. पुढे गटविकास अधिकारी ते आयुक्तपदापर्यंतच्या वाटचालीत मी नेहमीच माझा हेतू स्वच्छ ठेवला आहे...अशा शब्दांत आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आपला जीवनप्रवास उलगडला.
कोल्हापूर : सोलापूर जिल्ह्यातील वळसंग हे खेडेगाव. मी पाचवीत असताना वडील वारले. घरात सहा बहिणी. परिस्थिती गरिबीची. त्या काळातही मी एम.एस्सी. बी. एड्, नंतर प्राध्यापक म्हणून नोकरी धरली. पुढे गटविकास अधिकारी ते आयुक्तपदापर्यंतच्या वाटचालीत मी नेहमीच माझा हेतू स्वच्छ ठेवला आहे...अशा शब्दांत आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आपला जीवनप्रवास उलगडला.
‘अक्षर दालन' आणि 'निर्धार' यांच्यावतीने आयोजित १०५व्या 'अक्षरगप्पा' कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, घरची परिस्थिती नसताना आई मला शिकवत होती. तेव्हा गल्लीतील काहीजण तिला म्हणायचे. ‘कशाला शिकवतीस, तुझा पोरगा काय कलेक्टर होणार हाय काय?’ त्यामुळे मी कलेक्टर व्हावं असं आईला वाटायचं. मी नंदूरबारचा जिल्हाधिकारी झालो आणि आईची एक इच्छा पूर्ण केली. हे समाधान आयुष्यामध्ये खूप काही देऊन गेले.
मी महाविद्यालयात असताना शिवाजी विद्यापीठाचा सिनेट सदस्य झालो. राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यकर्ता ते प्राध्यापक अशा जबाबदाऱ्या पार पाडल्या. तिथे प्रामाणिकपणे समाजाची सेवा करण्याचे बाळकडू मिळाले.
यावेळी त्यांनी विविध नेत्यांसोबतच्या कामाचे अनुभव विशद केले. तसेच महाराष्ट्रातील स्वच्छता मोहिमांचा धावता आढावा घेतला.
जयंती ही मूळ नदी होती, तो नाला झाला होता. ही नदी वाहती करण्याचे आव्हान मी स्वीकारले. कोल्हापूरकरांनी मनापासून साथ दिली. हजारो टन कचरा काढला गेला. आता प्लास्टिकमुक्तीकडे आपली वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. रवींद्र जोशी यांनी स्वागत केले.