मुरगुड परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:27 AM2021-02-11T04:27:00+5:302021-02-11T04:27:00+5:30
: ओपन जिमसाठी निधी देणार मुरगुड : दैनंदिन धावपळीच्या व स्पर्धेच्या युगात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. योग्य आहार ...
: ओपन जिमसाठी निधी देणार
मुरगुड : दैनंदिन धावपळीच्या व स्पर्धेच्या युगात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. योग्य आहार व नियमित व्यायाम महत्त्वाचा असून, यासाठी बंदिस्त खोलीत व्यायाम करण्यापेक्षा निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन व्यायाम करणे हितकारक आहे. मुरगुड शहरामध्ये रिकाम्या जागेमध्ये ओपन जिम करण्यासाठी जो लागेल तो आपण निधी देण्यास तयार आहोत, मुरगुड शहरातील तसेच परिसरातील शिंदेवाडी, दौलतवाडी, शाहू नगर, यमगे या गावातील नागरिकांच्या आरोग्यासाठी आपण कायमच तत्पर राहू, असे अभिवचन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.
काही दिवसांपूर्वी मुरगुड शहरातील व परिसरातील अनेक नागरिकांनी मुरगुडमध्ये ओपन जिम व्हावी, अशी मागणी केली होती, याला अनुसरून नागरिकांनी मुश्रीफ यांना मागणीचे निवेदन दिले, त्यावेळी ते बोलत होते. शहरातील मोठ्या प्रमाणात नागरिक सकाळी आणि संध्याकाळी नागरिक फिरण्यासाठी बाहेर पडतात. सरपीराजीराव तलावाच्या काठावर आयटीआयच्या समोर जी रिकामी जागा आहे त्या ठिकाणी या जिमची रचना व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या संपूर्ण जिमचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी नागरिक घेण्यास तयार आहेत.
ओपन जिमच्या मागणीचे निवेदन शहरातील नागरिकांनी मंत्री मुश्रीफ यांच्याकडे नुकतेच सुपूर्त केले. यावेळी त्यांनी बोलताना सदरची संकल्पना चांगली असून, लागेल तो निधी देण्याचे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले आहे. निवेदन देताना माजी नगराध्यक्ष प्रकाश चौगले, दलितमित्र डी. डी. चौगले, महेश किल्लेदार, महादेव खराडे, स्वप्नील भोई, संजय पाथरवट, दत्तात्रय शिंदे आदी प्रमुख नागरिक उपस्थित होते.
फोटो ओळ :- मुरगुडमध्ये ओपन जिम उभा करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, या आशयाचे निवेदन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना देताना प्रकाश चौगले, महेश किल्लेदार, महादेव खराडे आदी.