समिती नेमली... वाद धुमसताच
By Admin | Published: May 19, 2015 12:35 AM2015-05-19T00:35:55+5:302015-05-19T00:48:44+5:30
अस्वस्थ गांधीनगर : तात्पुरती मलमपट्टी; नवीन जागेचा निर्णय होईपर्यंत पुतळा त्याच जागेवर राहणार; बाजारपेठ सुरु
कोल्हापूर : गांधीनगर (ता. करवीर) येथील शिरु चौकात बसवलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हटविण्यासंबंधी सामंजस्याने निर्णय घेण्यासाठी करवीरचे प्रांताधिकारी प्रशांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय समिती नियुक्त केली असून, ती लवकरच तोडगा काढेल. तोपर्यंत बंद मागे घेऊन सिंधी समाजाने सोमवारी दुपारपासूनच दुकाने सुरू करावीत, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले. त्यानंतर गेल्या आठवड्याभरापासून बंद असलेली गांधीनगर बाजारपेठ सुरू झाली.
या प्रश्नाबाबत त्यांनी दलित व सिंधी समाजातील प्रमुख नेत्यांशी या वादाबाबत चर्चा केली. त्यास आमदार अमल महाडिक, राजेश क्षीरसागर, महेश जाधव, भगवान काटे, रिपब्लिकन पक्षाचे शहाजी कांबळे, उत्तम कांबळे, सिंधी समाजाचे भजनलाल डेंबडा, भगतराम छाबरा, रमेश तनवाणी, माजी सरपंच पूनम परमानंदानी, रितू लालवाणी, सरपंच सौ. लक्ष्मी उदासी, सिंधू सभेचे मनोज बचवाणी, सुरेश आहुजा, आदी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘सिंधी समाजाचा आंबेडकरांच्या पुतळ््यास विरोध नाही परंतु जिथे तो बसविला आहे, ती जागा बाजाराची आहे. त्यामुळे भविष्यात विटंबनेसारखे प्रकार झाल्यास त्यातून गांधीनगरचे स्वास्थ बिघडेल, अशी भीती या समाजाला वाटते. जिथे पुतळा बसविला आहे, ती जागा सरकारची आहे. सार्वजनिक ठिकाणीच पुतळा बसविला आहे, त्यामुळे विटंबना होईल, असे सांगून पुतळ््यास विरोध का, असे दलित समाजाचे म्हणणे आहे. या दोन्ही समाजाचे म्हणणे तात्त्विकदृष्ट्या योग्यच आहे, परंतु तरीही या प्रश्नांतून दोन्ही समाजाशी बोलून तोडगा काढण्याची गरज आहे. हा तोडगा दोन्ही समाजाला सन्मानजनकच असेल, असा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठीच प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती नियुक्त केली आहे.
पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन हा वाद मिटावा म्हणून समिती नियुक्त केली आहे. त्यातून सन्मानजनक तोडगा निघावा, अशी अपेक्षा आहे.
- भजनलाल डेंबडा, अध्यक्ष,
सिंधी सेंट्रल पंचायत गांधीनगर
व्यापाऱ्यांनी अगोदर बंद मागे घ्यावा, ही आमची मागणी होती. ती मान्य झाली आहे. समिती चर्चेतून योग्य तोडगा काढील, असा विश्वास वाटतो.
- प्रा. शहाजी कांबळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, रिपब्लिकन पक्ष, आठवले गट
ेलवकरच निर्णय
पुतळ्याच्या जागेबाबत ही समिती लवकरच निर्णय घेईल असे सांगून पालकमंत्र्यांनी या सवंदेनशील प्रश्नावर सामंजस्याने तोडगा काढण्यासाठीच समिती नेमल्याचे स्पष्ट केले.