वस्त्रोद्योग धोरण ठरविण्यासाठी समिती गठीत, राज्यभरातील २४ सदस्यांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 05:39 PM2022-11-17T17:39:42+5:302022-11-17T17:40:06+5:30

समितीत कोल्हापुरातील इचलकरंजीमधील तिघांचा समावेश

Committee constituted to decide next five year policy of textile industry of the state | वस्त्रोद्योग धोरण ठरविण्यासाठी समिती गठीत, राज्यभरातील २४ सदस्यांचा समावेश

संग्रहित फोटो

Next

इचलकरंजी : वस्त्रोद्योगाचे राज्याचे पुढील पंचवार्षिक धोरण ठरविण्यासाठी शासनाने बुधवारी समिती गठीत केली. त्यामध्ये वस्त्रोद्योगाशी संबंधित राज्यभरातून २४ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती दोन महिन्यांत आपला अहवाल शासनाला देणार आहे. याबाबतचे आदेश अव्वर सचिव विशाल मदने यांनी काढले.

शेतीखालोखाल रोजगार देणाऱ्या वस्त्रोद्योगाला राज्यात चालना देण्यासाठी नवीन धोरण, उपाययोजना, गरजा, वस्तूस्थिती असे सर्वसमावेशक वस्त्रोद्योग धोरण सन २०२३ ते २८  राबवले जाणार आहे. त्यासाठी नागपूरच्या वस्त्रोद्योग आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली. तसेच प्रादेशिक उपायुक्त नागपूर हे सदस्य सचिव असणार आहेत.

त्यामध्ये पणन, रेशीम, वस्त्रोद्योग, प्रादेशिक उपायुक्त, वस्त्रोद्योग महासंघ व्यवस्थापकीय संचालक, मेडाचे प्रतिनिधी, लोकर संशोधन संस्था प्रतिनिधी, सॅसमिराचे प्रतिनिधी, गारमेंट प्रतिनधी, एनआयएफटी प्रतिनिधी सदस्य नियुक्त केले आहेत. त्याचबरोबर सूतगिरणी, यंत्रमाग, हातमाग प्रतिनिधी म्हणून आमदार प्रकाश आवाडे, समाधान अवताडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, मालेगावचे मनोज दिवटे (येवला), पिंजारी शेख सलीम शेख रज्जाक (मालेगाव), किशोर उमरेडकर (नागपूर), शाम चांदेकर, पेंटाप्पा गड्डम, लक्ष्मीनारायण देवसानी (सोलापूर), शरद मडवी (भिवंडी), गारमेंट प्रतिनिधी म्हणून अंकूर गादिया कोषाध्यक्ष, दिनेश नंदू उपाध्यक्ष, आदींचा समावेश आहे.

मागील वस्त्रोद्योग धोरण सन २०१९ ते २३ हे २ फेब्रुवारी २०१८ ला जाहीर केले होते. ३१ मार्च २०२३ ला त्याची मुदत संपणार आहे. त्यामुळे तेथून पुढे सन २०२८ पर्यंतचे नवीन धोरण जाहीर करण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली आहे. यापूर्वी आमदार प्रकाश आवाडे यांची एकसदस्यीय समिती नियुक्त केली होती. त्यानंतर माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचीही एकसदस्यीय समिती स्थापन केली होती. या दोघांनी सादर केलेल्या शिफारशींचा समावेश त्यावेळच्या वस्त्रोद्योग धोरणात करण्यात आला होता.

इचलकरंजीतील तिघांचा समावेश

यापूर्वी एकसदस्यीय समितीमध्ये काम केलेल्या प्रकाश आवाडे व सुरेश हाळवणकर यांच्यासह नव्याने अशोक स्वामी यांचीही या समितीत नियुक्ती करण्यात आली आहे, असे इचलकरंजीतील तिघांचा या समितीत समावेश आहे.

Web Title: Committee constituted to decide next five year policy of textile industry of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.