समिती ठरविणार 'निती', मगच उपकेंद्राला 'गती'; शिवाजी विद्यापीठाच्या सांगलीतील उपकेंद्रासाठी समिती स्थापन
By पोपट केशव पवार | Published: November 29, 2023 12:49 PM2023-11-29T12:49:00+5:302023-11-29T12:49:25+5:30
पोपट पवार कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली जिल्ह्यात करण्यासाठी जनरेटा वाढत आहे. उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही विद्यापीठाने ...
पोपट पवार
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली जिल्ह्यात करण्यासाठी जनरेटा वाढत आहे. उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही विद्यापीठाने प्रस्ताव दिल्यास दोन मिनिटांत उपकेंद्राला मंजुरी देऊ, असे सांगितले आहे. या उपकेंद्रासाठी व्यवस्थापन परिषदेने सात सदस्यांची समिती स्थापन केली आहे. उपकेंद्रासाठी जागा, अभ्यासक्रम व मनुष्यबळ यांचे धोरण ठरवून त्याचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. या अहवालानंतरच विद्यापीठ प्रशासन उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविणार आहे.
विद्यापीठाच्या अखत्यारित कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत २८६ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांचा कार्यालयीन संबंध थेट विद्यापीठाशी येत असतो. मात्र, सांगली व सातारा जिल्ह्यांतील अनेक तालुके हे विद्यापीठापासून दीडशे किलोमीटर अंतरावर आहेत. तेथून विद्यापीठात येणे विद्यार्थी, शिक्षकांना शक्य नाही.
राज्य सरकारने २०१६ मध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी विद्यापीठ स्थापन करण्याचे धोरणे आखले. त्यानंतर सांगली जिल्ह्यात उपकेंद्र स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यासाठी जिल्ह्यात आटपाडी, जत, शिराळा, मिरज येथे उपकेंद्र व्हावे यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी आग्रह धरला. मात्र, येथील कोणत्याच जागेवर एकमत न झाल्याने हा विषय रेंगाळत पडला. मात्र, आता पुन्हा या विषयाने उचल खाल्ली आहे.
समितीचे काम काय असणार
उपकेंद्रासाठी स्थापन केलेल्या समितीची लवकरच बैठक होणार आहे. उपकेंद्रात कोणते अभ्यासक्रम असावेत, उपकेंद्रासाठी जागा, उपलब्ध मनुष्यबळ याचा अभ्यास करून अहवाल तयार केला जाणार आहे. तो अहवाल आल्यानंतर विद्यापीठ उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाकडे उपकेंद्रासाठीचा प्रस्ताव पाठविणार आहे. सध्या तरी भाड्याच्या जागेत उपकेंद्र सुरू करण्याचा मतप्रवाह आहे. त्यादृष्टीनेच हालचाली सुरू आहेत.
उपकेंद्र सांगलीत, सदस्य कोल्हापूरचे..
विद्यापीठाने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीत बहुतांशी सदस्य हे कोल्हापूरचे असल्याने उपकेंद्र सांगलीत होणार आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ मात्र कोल्हापूरचे का, अशी विचारणा सांगलीतून झाली.
सांगली जिल्ह्यातील कॉलेजची संख्या
- कला, वाणिज्य व विज्ञान- ५८
- शिक्षणशास्त्र- १२
- अभियांत्रिकी, आर्किटेक्ट- ५
- औषधनिर्माण शास्त्र- ५
- विधी-३
- शारीरिक शिक्षण- १
सांगलीत उपकेंद्र स्थापन करण्यासाठी विद्यापीठ सकारात्मक आहे. त्यासाठी समितीही स्थापन केली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर प्रस्ताव पाठविणार आहोत. -डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी विद्यापीठात जावे लागते. त्यामुळे जिल्ह्यात विद्यापीठाचे उपपरिसर केंद्र सुरू करावे. त्यात जिल्ह्यात नसणारे अभ्यासक्रम सुरू व्हावेत. - संजय परमणे, सदस्य, व्यवस्थापन परिषद, शिवाजी विद्यापीठ.
उपकेंद्र स्थापन करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीची लवकरच बैठक घेणार आहे. या उपकेंद्रात कोणते अभ्यासक्रम असावे यावर अभ्यास करून अहवाल तयार केला जाईल. - डॉ. व्ही. एम. पाटील, अध्यक्ष, उपकेंद्र निर्मिती समिती.