कोविड सेंटरमधील लैंगिक अत्याचारप्रकरणी चौकशी समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:28 PM2021-06-18T16:28:21+5:302021-06-18T16:29:56+5:30
Muncipal Corporation Kolhapur : कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत चालविल्या जाणाऱ्या शिवाजी विद्यापीठ वसतीगृह क्रमांक ३ मध्ये एका अल्पयीन निराधार मुलीवर झालेल्या लैगिंग अत्याचार प्रकरणी चौकशी करण्याकरिता प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी चौकशी समिती नियुक्त केली आहे.
कोल्हापूर : महानगरपालिकेमार्फत चालविल्या जाणाऱ्या शिवाजी विद्यापीठ वसतीगृह क्रमांक ३ मध्ये एका अल्पयीन निराधार मुलीवर झालेल्या लैगिंग अत्याचार प्रकरणी चौकशी करण्याकरिता प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी चौकशी समिती नियुक्त केली आहे.
प्रशासक बलकवडे यांनीच शुक्रवारी पत्रकारांना याबाबत माहिती दिली. कोविड सेंटरमध्ये घडलेला प्रकार अत्यंत दुदैवी आहे. पोलिस त्याचा तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले.
अनाथ मुलींचे संगोपन करणाऱ्या कोल्हापुरातील एका संस्थेतील काही मुलींना कोरोनाची लागण झाल्यानंतर महापालिकेच्यावतीने चालविल्या जाणाऱ्या शिवाजी विद्यापीठ वसतीगृह क्रमांक ३ येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. त्यावेळी एक अल्पवयीन मुलीवर कोविड सेंटरमधील कंत्राटी वॉर्डबॉय अंकुश मच्छिंद्र पवार याचेकडून लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला असल्याचा दावा केला जात आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद झाला असून त्याला अटकही झाली आहे.
एकीकडे पोलिस या प्रकरणाची चौकशी करत असताना आता महानगरपालिका प्रशासनही घडलेल्या प्रकाराची चौकशी करणार आहे. त्याकरिता उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्यासह एक महिला वैद्यकिय अधिकाऱ्याची समिती नियुक्त केली आहे. ही चौकशी कोविड सेंटरमध्ये सुरक्षिततेच्या बाबत काही त्रुटी होत्या का ? तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते की नाही, कोविड सेंटर मधील कोणी जबाबदार आहे का ? हा प्रकार घडला तेंव्हा तेथे महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक झाली होती की नाही या प्रशासकिय बाबींच्या अनुषंगाने असणार आहे.
उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्या समितीने चौकशीला सुरवात केली आहे. कोविड सेंटरची पाहणीही त्यांनी केली आहे. तेथील कर्मचाऱ्यांचे जाबजबाब घेतले जात आहेत. अत्याचारग्रस्त मुलीशीही त्या चर्चा करणार आहेत. चौकशी अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे बलकवडे यांनी सांगितले.