यात्रेतील पैशावरून समिती सदस्याचा खून !
By admin | Published: April 30, 2015 12:46 AM2015-04-30T00:46:35+5:302015-04-30T00:49:11+5:30
काटेवाडी येथील घटना : आरोपी पितापुत्राला अटक
पुसेगाव : श्री मानाप्पा यात्रा कमिटीच्या बैठकीत वार्षिक यात्रेत पैशाच्या हिशेबावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून काटेवाडी (ता. खटाव) येथील संजय शंकर कोरडे (वय ४४) यांचा मंगळवारी रात्री काटेवाडी (बुध) फाट्याजवळ धारदार हत्याराने निर्घृण खून करण्यात आला. याप्रकरणी पुसेगाव पोलिसांनी पितापुत्राला अटक केली आहे. धनंजय कोरडे (५४) व मुलगा संतोष कोरडे (२६, रा. काटेवाडी) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, यात्रा झाल्यानंतर दरवर्षी समिती व ग्रामस्थांच्या बैठकीत वर्षाचा जमा-खर्च द्यावयाचा असतो. यात्रा समितीत २०१३ पासून धनंजय बाळकृष्ण कोरडे, संजय शंकर कोरडे यांच्यासह अन्य तिघेजण पंच म्हणून काम पाहत आहेत. या गावची वार्षिक यात्रा नुकतीच पार पडली होती.
सोमवार (दि. २७) धनंजय कोरडेने संजय यांच्याशी मोबाईलवर ‘यात्रेतील हिशेबाचे पैसे आजच्या आज माझ्याकडे जमा करा,’ असे सांगितले होते. ‘मी सध्या पत्रिका वाटण्यासाठी बाहेर आहे. संध्याकाळी मीटिंगमध्ये पैसे जमा करतो,’ असे संजय यांनी त्याला प्रत्त्युतर दिले. यात्रा समितीची बैठक सोमवारी सायंकाळी सहा वाजता होती. यावेळी बैठकीत समितीतील काही सदस्यांनी ‘धनंजय कोरडे हा इतर सदस्यांना विश्वासात घेत नसून मनमानी कारभार करत आहे. त्यामुळे आम्ही समितीचा राजीनामा देतो,’ असे सांगत पाच पैकी तीन सदस्यांनी ग्रामस्थांसमोर राजीनामे दिले होते. यावेळी धनंजय कोरडे व संजय कोरडे यांच्यात बाचाबाचीही झाली होती.
दुसऱ्या दिवशी मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास संजय कोरडे हे एकत्र कुटुंबासह जेवण करीत असताना त्यांना कोणाचा तरी फोन आला. जेवण झाल्यानंतर संजय दुचाकीवरून काटेवाडी फाटा येथील कमानीजवळ गेले. घरातील मंडळी लग्नाच्या तयारीच्या कामात व्यस्त असतानाच गावातील एका व्यक्तीने संजय जखमी अवस्थेत पडले असल्याचा निरोप त्यांच्या घरी दिला. संजय यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले व सहा भाऊ असा परिवार आहे. उत्तम शंकर कोरडे यांनी पुसेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे अधिक तपास करीत आहेत. याप्रकरणी पुसेगाव पोलिसांनी धनंजय कोरडे व संतोष कोरडे या पितापुत्राला अटक केली आहे. (वार्ताहर)
चार ठिकाणी वार..
धारदार शस्त्राने गळा व डोक्यासह अंगावर चार ठिकाणी वार केले गेले असल्याने संजय गंभीर जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडले होते. काही नागरिकांनी त्यांना तातडीने पुसेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र प्रकृती चिंत्ाांजनक असल्याने कोरेगावला नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.