जिल्हा बँक कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:44 AM2021-02-18T04:44:20+5:302021-02-18T04:44:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी प्राथमिक समिती नेमली आहे. गेल्या दहा वर्षांपासून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी प्राथमिक समिती नेमली आहे. गेल्या दहा वर्षांपासून पगारवाढ न झाल्याने बँकेशी संलग्न दोन्ही कर्मचारी युनियनने न्यायालयात धाव घेतली आहे.
जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांचा पगारवाढीचा करार हा तीन वर्षांतून होतो. दोन्ही कर्मचारी युनियनशी चर्चा करून बँक प्रशासन पगारवाढीचा निर्णय घेते. बँकेने २००८-०९ मध्ये पगारवाढीबाबत युनियनशी करार केला होता. मात्र त्यानंतर बँकेवर प्रशासक आले. सहा वर्षे प्रशासकीय कारकिर्दीत करार झालाच नाही. त्यानंतर मे २०१५ ला बँकेवर संचालक मंडळ आले. बँक कोट्यवधी रुपयांच्या संचित तोट्यात असल्याने संचालक मंडळाने काटकसरीचा निर्णय घेतला. गेल्या सहा वर्षांत बँकेच्या संचालक मंडळाने काटकसरीचा कारभार करीत बँक नफ्यात आणली. बँकेनेही कर्मचाऱ्यांना बोनस व संस्था सभासदांना लाभांश वाटप केले.
आता बँक युनियनने पगारवाढीची मागणी केली आहे. गेल्या दहा-अकरा वर्षांत पगारवाढीचा करार झालेला नाही. बँक नफ्यात आल्याने त्रिवार्षिक करार करावा, यासाठी दोन्ही युनियनने न्यायालयात दाद मागितली आहे. दरम्यान, याबाबत चर्चा करण्यासाठी बँक प्रशासनाने बँकेचे व्यवस्थापक जी. एम. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक समिती स्थापन केली आहे. ही समिती पगारवाढीबाबत चर्चा करून संचालक मंडळासमोर अहवाल सादर करणार आहे.