ड्रेनेजचे पाणी पाहून समितीही अवाक्

By admin | Published: January 25, 2016 12:57 AM2016-01-25T00:57:16+5:302016-01-25T00:57:16+5:30

रंकाळा तलावाची पाहणी : बडोद्याच्या तज्ज्ञ समितीकडे कमकुवत उपाययोजना केल्याची पर्यावरणवाद्यांची तक्रार

The committee was surprised to see the water of the drainage | ड्रेनेजचे पाणी पाहून समितीही अवाक्

ड्रेनेजचे पाणी पाहून समितीही अवाक्

Next

कोल्हापूर : राष्ट्रीय हरित लवादाने नेमलेल्या बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या तज्ज्ञ समितीने रविवारी रंकाळा तलावाला प्रदूषित करणाऱ्या विविध घटकांवर महापालिकेने केलेल्या खर्चाची उपयुक्तता तपासली. त्यासाठी या समितीने विविध ठिकाणी भेटी देत सांडपाणी रोखण्यासाठी केलेले प्रयत्न, नेमका केलेला खर्च, त्याची उपयुक्तता तसेच प्रकल्प आराखडा आवश्यक आहे का? याचीही तपासणी केली. रंकाळा तलावात मिसळणारे सांडपाणी पाहून समितीही अवाक् झाली.
रंकाळा तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने खर्च केलेले ८ कोटी ६५ लाख रुपये आणि तलावासाठीच नव्याने सादर केलेला सविस्तर १२७ कोटींच्या प्रकल्प आराखड्याला पर्यावरणवादी कार्यकर्त्यांकडून आक्षेप घेतला आहे. याबाबत कदमवाडी येथील नागरिक सुनील केंबळे यांनी रंकाळा तलावाच्या प्रदूषणासंदर्भात एक जनहित याचिका राष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल केली असून, त्यावर सुनावणी सुरू आहे. या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने रंकाळा तलावातील प्रदूषण रोखण्यासंदर्भात कोणत्या उपाययोजना केल्या, त्यांनी त्यावर किती निधी खर्च केला आहे, त्याशिवाय भविष्यकाळात राबविण्यात येणाऱ्या योजना काय आहेत, याची प्रत्यक्ष तलावाजवळ जाऊन पाहणी व तपासणी करावी आणि त्याबाबतचा अहवाल सादर करावा, असे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले होते. केलेल्या उपायोजनावरील खर्चाची उपयुक्तता तटस्थ संस्थेकडून तपासावी, असेही लवादाने म्हटले. त्यासाठी बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या तज्ज्ञ प्राध्यापकांच्या समितीची नियुक्ती केली आहे. त्यानुसार या समितीचे डॉ. उपेंद्र पटेल आणि डॉ. निर्मल शहा यांनी रविवारी दिवसभर प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या विविध उपाययोजनांची तपासणी केली. त्यांच्यासोबत महापालिकेचे पर्यावरण अभियंता आर. के. पाटील, ड्रेनेज विभागाचे उपअभियंता एस. बी. कुलकर्णी हेही उपस्थित होते. येत्या २८ जानेवारी रोजी याबाबतची हरित लवादासमोर सुनावणी असल्याने त्यावेळी हा थेट अहवाल सादर करण्यात येणार आहे.
रविवारी सकाळी दुधाळी नाला, धुण्याची चावी येथून या तज्ज्ञांच्या समितीने तपासणीला प्रारंभ केला. त्यांनी विविध ठिकाणची पाहणी करून तेथे काही पाण्याचे नमुने घेतले. आवश्यक ठिकाणी काही छायाचित्रे घेण्यात आली, तर काही ठिकाणच्या पाण्याच्या दुर्गंधीबाबत त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. देशमुख हॉलसमोरील आणि श्याम सोसायटीतील ड्रेनेजचे पाणी अन्यत्र वळविण्यात आल्याबाबतची त्यांनी सखोलपणे चौकशी केली. याशिवाय तांबट कमानीनजीकच्या गणेश विसर्जन कुंडातील पाण्याबाबत केलेल्या उपाययोजनाबाबत चौकशी केली.
या तज्ज्ञ समितीकडून रंकाळा पहाणीवेळी सांडपाण्यापासून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत. तलावातील पाणी स्वच्छ राहण्यासाठी काय केले आहे. जनावरे, कपडे, वाहने धुण्यापासून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, याची माहिती या समितीकडून एकत्रित करण्यात आली. त्याचबरोबर महापालिका प्रशासनाने भविष्यात कोणत्या योजना राबविण्याचे ठरविले आहे, यासह योजनांची आवश्यकता तपासून पाहिली.
तज्ज्ञांच्या समितीकडून तपासणी केलेली ठिकाणे
धुण्याची चावी परिसर, दुधाळी नाला, रंकाळा टॉवर, राजघाट परिसर, अंबाई टँक परिसर, फुलेवाडी पेट्रोलपंपनजीकचा वळविलेला नाला, हरिओम नगरमधील ड्रेनेज पाणी, पदपथ उद्यान, परताळाची अवस्था, पंपिंग स्टेशन (श्याम सोसायटी नाला), देशमुख हॉल परिसरातील ड्रेनेज पाणी, घरगुती गणेश विसर्जन कुंड (तांबट कमान), पतौडी घाट.
पर्यावरणवाद्यांकडून समितीकडे तक्रारी
रंकाळा संरक्षण व संवर्धन समिती, राजे संभाजी तरुण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दुपारी या तज्ज्ञ समितीची भेट घेऊन तक्रारीचा पाढाच वाचला. परिसरातून सांडपाणी तलावात मिसळत असल्याचीही तक्रार केली. पुईखडी टेकडीवरून पाण्याचे नैसर्गिक स्रोत येऊन ते रंकाळा तलावात मिसळत होते. पण महापालिकेच्या दुर्लक्षामुळे हे पाण्याचे स्रोत बंद झाले आहेत. पण श्याम सोसायटी तसेच अंबाई जलतरण तलाव परिसरातील सांडपाणी वळविण्यात महापालिकेला अपयश आले आहे, अशाही तक्रारी या कार्यकर्त्यांनी केल्या. यामध्ये अजित चव्हाण, अमर जाधव, दिलीप कदम, सुनील हराळे, विकास जाधव तसेच याचिकाकर्ता सुनील केंबळे यांचा सहभाग होता.

Web Title: The committee was surprised to see the water of the drainage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.