समित्या अनिश्चित; पण निवडणूक बिनविरोध

By admin | Published: April 21, 2017 12:20 AM2017-04-21T00:20:16+5:302017-04-21T00:20:16+5:30

जिल्हा परिषद : पालकमंत्र्यांशी चर्चा करून दहा नावे निश्चित करणार

Committees are uncertain; But the election uncontested | समित्या अनिश्चित; पण निवडणूक बिनविरोध

समित्या अनिश्चित; पण निवडणूक बिनविरोध

Next

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांची सदस्य निवड गुरुवारी बिनविरोध झाली. मात्र, कुठल्या सदस्याला कुठली समिती हे संध्याकाळपर्यंत निश्चित झाले नव्हते. तसेच दहा जागांची नावे थेट पालकमंत्र्यांसमवेत चर्चा झाल्यानंतर निश्चित करण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणूक होऊनही सदस्यांची यादी जाहीर न करता सभा संपवावी लागली.
दुपारी एक वाजता जिल्हा परिषदेच्या शाहू सभागृहामध्ये अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात पावणे दोननंतर सभेचे कामकाज सुरू झाले. जिल्हा परिषदेच्या विषय समिती सदस्यपदासाठी सकाळी १० ते ११ या वेळेत इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार ७३ जागांसाठी तेवढेच अर्ज आले आहेत. त्यामुळे ७३ सदस्यांच्या बिनविरोध निवडी झाल्या आहेत, असे अध्यक्षा महाडिक यांनी जाहीर केले.
यानंतर भाजपचे पक्षप्रतोद विजय भोजे यांनी उर्वरित १० जागा अध्यक्षांनी त्यांच्या अधिकारात भराव्यात, अशी सूचना केली. यावेळी माजी अध्यक्ष उमेश आपटे यांनी आमच्याशी चर्चा करून मग ही दहा नावे जाहीर करावीत, अशी मागणी केली.
एवढ्यात सत्तारूढ गटाचे राहुल आवाडे यांनी कायदेशीर मार्गाने या दहा जागा भरा, अशी मागणी केली. यानंतर अध्यक्षांनी सभा संपल्याचे जाहीर केले. केवळ अर्ध्या तासात सभेचे कामकाज संपविण्यात
आले.
यावेळी विजय भोजे यांनी हुपरी येथे नगरपरिषद मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला; तर सदस्य सतीश पाटील यांनी नवीन सदस्यांना लॅपटॉप देण्याची मागणी केली. यावेळी सदस्यांना प्रातिधिक स्वरूपात अध्यक्षांच्या हस्ते ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले.


अध्यक्षांच्या दालनामध्ये चर्चा
अध्यक्षा शौमिका महाडिक, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील-कळेकर, सभापती सर्जेराव पाटील-पेरिडकर, अंबरीश घाटगे, शोभा शिंदे, विशांत महापुरे, पक्षप्रतोद विजय भोजे, गटनेता अरुण इंगवले, माजी अध्यक्ष उमेश आपटे, बांधकाम समितीचे माजी सभापती जयवंतराव शिंपी, युवराज पाटील यांच्यामध्ये चर्चा झाली. १०३ सदस्यांची निवड करावयाची होती. त्यापैकी २० ठिकाणी पदाधिकारी पदसिद्ध असतात. त्यामुळे उर्वरित ८३ जागांपैकी १० जागांची नावे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील हे निश्चित करणार असल्याचे सांगण्यात आले. उर्वरित ७३ जागांपैकी विरोधी ३० सदस्य आणि सात सभापतींना समितीवर संधी देण्यात येणार असून, सत्तारूढांच्या ४२ जणांना संधी मिळणार आहे.

सत्तारूढमध्येही मतभेद
सर्व समित्यांवर सत्तारूढ सात-आठ गट आणि पक्षांच्या सदस्यांना मनपसंत समिती देताना नेत्यांची दमछाक झाली. मात्र, सर्वांचे समाधान न झाल्याने सत्तारूढांमध्येही मतभेद समोर आले. एवढेच नव्हे तर एकीकडे भाजपचे पक्षप्रतोद विजय भोजे यांनी दहा जागा अध्यक्षांच्या अधिकारात सर्वांशी चर्चा करून भराव्यात, अशी सूचना केल्यानंतरही सत्तारूढमधील सहभागी राहुल आवाडे यांनी जे काही करायचे आहे ते कायदेशीरपणे करा, अशी सूचना करीत एकवाक्यता नसल्याचे स्पष्ट केले. मी कोणत्याही समितीसाठी अर्ज केलेला नाही, असेही ते सभेनंतर सर्वांना सांगत होते.
परिचय सत्र
सभागृहात सर्वजण बसल्यानंतर अध्यक्षांना येण्यासाठी वेळ होत होता. त्यावेळी अरुण इंगवले यांनी सर्व सदस्यांनी आपापला परिचय करून द्यावा, अशी सूचना केली. त्यानुसार सदस्यांनी, तर नंतर अध्यक्षांच्या सूचनेनुसार अधिकाऱ्यांनी आपला परिचय करून दिला.


ऐनवेळची चर्चा
निवडणुकीची तारीख जाहीर होऊन दहा दिवस उलटले तरी विरोधी पक्ष आणि सत्तारूढांमध्ये सभागृहात जाईपर्यंत चर्चा सुरू होती. सकाळी अध्यक्षांच्या निवासस्थानी सत्तारूढ सदस्यांची बैठक बोलावण्यात आली होती. त्या ठिकाणी अर्जावर सर्वांच्या सह्या घेण्यात आल्या. यानंतर दुपारी बारानंतर सर्वजण जिल्हा परिषदेत आले.
पुढच्या सभेवेळी
बॅग, डायरी, बॅच
पुढच्या सभेवेळी प्रत्येक सदस्याला डायरी, बॅग आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून एक स्वतंत्र बॅच देण्यात येणार आहे. अर्थ समितीचे सभापती अमरीश घाटगे यांनी सभागृहात ही माहिती दिली.

Web Title: Committees are uncertain; But the election uncontested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.